कुंडुझ (अफगाणिस्तान) : शनिवारी पूर्वोत्तर अफगाणिस्तानात भूसुरूंगाच्या स्फोटात नऊ मुले ठार झाली, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. दीर्घकाळ सुरू असलेल्या युद्धामध्ये नागरीकांच्या मृत्यूचे प्रमाण दिवसेंदिवस वाढते आहे. तखार प्रांताच्या दारकड जिल्ह्यात हा स्फोट झाला. तालिबान नियंत्रित एका गावात मुलांनी रस्त्याच्या कडेला पेरलेल्या भूसुरुंगावर पाय ठेवल्यावर स्फोट झाला.
आज सकाळी 8.30 वाजता तालिबान्यांनी घडवलेल्या स्फोटात नऊ शाळकरी ठार झाले, असे तखार प्रांताच्या राज्यपालांचे प्रवक्ते जावद हेजरी यांनी वृत्तसंस्थेला सांगितले. ही सर्व मुले 7 ते 11 वयोगटातील होती, असे ते म्हणाले.
यावर्षी जुलै ते सप्टेंबर या कालावधीत अफगाणिस्तानात अभूतपूर्व नागरिक ठार किंवा जखमी झाले आहेत, असा एक अहवाल गेल्या महिन्यात, संयुक्त राष्ट्र संघाने जाहीर केला होता. 1 जुलैपासून 30 सप्टेंबर पर्यंत 1,174 मृत्यू आणि 3,139 जखमी झाल्याचा उल्लेख त्यामध्ये आहे. ही आकडेवारी मागील वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत 42 टक्के अधिक आहे.