एकास अटक : गुन्हे शाखेची उंड्री भागात कारवाई
पुणे – पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने एका नायजेरियन नागरिकाला अटक करून 88 लाख रुपयांच्या कोकेनसह 91 लाख 79 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. यापूर्वीही एका नायजेरियन नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात कोकेनचा साठा जप्त करण्यात आला होता.
उंड्री परिसरात नायजेरियन व्यक्ती कोकेन हा अंमलीपदार्थ विक्रीसाठी येणार आहे, अशी माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार सहायक पोलीस आयुक्त समीर शेख यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विजय टिकोळे यांच्या पथकाने सापळा रचून नायजेरियन व्यक्तीस अटक करत त्याच्या ताब्यातून 733 ग्रॅम कोकेन पावडरसह एकूण 91 लाख 79 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
शोलाडॉये सॅम्युअल जॉय (वय 44) असे आरोपीचे नाव आहे. तो कापड व्यापाराच्या बहाण्याने बिझनेस व्हिसावर भारतात फेब्रुवारीत आला आहे. त्यानंतर तो उंड्री परिसरात रावत कॅप्सस्टोन सोसायटीत भाड्याने घर घेऊन राहात होता आणि कोकेनची तस्करी करत होता. त्याला मदत करणाऱ्या साथीदारांचा शोध घेण्यात येत असून इतक्या मोठ्या प्रमाणात कोकेन त्याने कोठून आणले, याची चौकशी करण्यात येत आहे. ही कारवाई पोलीस कर्मचारी अविनाश शिंदे, मोकाशी, राहुल जोशी, महेंद्र पवार, प्रफुल्ल साबळे, मनोज साळुंखे, अमित छडीदार, योगेश मोहिते यांच्या पथकाने केली.
उच्चभ्रू वस्तीत विक्री
जॉय याच्या घराची पोलिसांनी झडती घेतली, असता 87 लाख 96 हजार रुपयांची कोकेन पावडर, तीन लाख 68 हजार रुपये रोख, पाच मोबाइल फोन, 90 हजार रुपयांची तीन महागडी घड्याळे, डिजिटल वजनकाटा व कोकेन पावडर बांधण्यासाठी प्लॅस्टिक पिशव्या असा मुद्देमाल मिळून आला आहे. या प्रकारानंतर पुणे शहर परिसरात एनआयबीएम रोड, उंड्री अशा उच्चभ्रू वस्तीत कोकेन या अंमलीपदार्थाची तो विक्री करत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.