879 ग्रामपंचायत निवडणुकीचा वाजला बिगुल

गावोगावी उडणार राजकीय धुरळा; सरपंच आरक्षण सोडतीकडे जिल्ह्याचे लक्ष

सातारा -जिल्ह्यातील 879 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा बिगुल वाजला असून या ग्रामपंचायतींसाठी 15 जानेवारीला मतदान होणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने हा कार्यक्रम जाहीर केल्याने गावागावांत आता वातावरण तापून राजकीय धुरळा उडणार आहे. 

जिल्ह्यातील 879 ग्रामपंचायतींची प्रभागरचना जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर अंतिम करण्यात आली. दि. 14 डिसेंबर रोजी अंतिम मतदारयादी प्रसिद्ध करण्यात येणार असून या निवडणुका पारदर्शी वातावरणात व मुदतीत पार पाडण्याची जवाबदारी जिल्हाधिकाऱ्यांवर सोपवण्यात आली आहे. मार्च महिन्यात उदभवलेल्या करोना संकटामुळे निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. ा जिल्ह्यातील 879 ग्रामपंचायतींसाठी 15 जानेवारी रोजी सकाळी साडेसात ते साडेपाच या दरम्यान मतदान केले जाणार आहे. महाराष्ट्रात नांदेड जिल्ह्याखालोखाल सर्वाधिक ग्रामपंचायती सातारा जिल्ह्यातील असून जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे.

त्या त्या कार्यक्षेत्रातील तहसीलदारांकडून आचारसंहितेची घोषणा करण्यात आली. सातारा तालुक्‍यात 133, पाटण तालुक्‍यात 107, खटाव तालुक्‍यात 90, कराड तालुक्‍यात 103, फलटण तालुक्‍यात 78, जावळी तालुक्‍यात 75, खंडाळा तालुक्‍यात 57, वाई तालुक्‍यात 76, कोरेगाव तालुक्‍यात 55, महाबळेश्‍वर तालुक्‍यातील 42 ग्रामपंचायतीची निवडणूक जाहीर झाली आहे. सरपंच आरक्षण सोडतीकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

महाविकास आघाडी रिंगणात असणार का?
पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसने भाजपला धूळ चारली. सातारा जिल्हयात बहुतांश ठिकाणी व ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे . त्यामुळे पुन्हा ग्रामपंचायत निवडणुकांच्या निमित्ताने भाजप व राष्ट्रवादी पुन्हा आमनेसामने येणार आहेत. महाविकास आघाडीचे कॉंग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी हे त्रिकुट स्थानिक पातळीवरच्या निवडणुकीत एकत्र येणार का, हा खरा कळीचा मुद्दा आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.