काबूल – अफगाणिस्तानातील काबूलच्या विमानतळाबाहेर काल झालेल्या दोन बॉम्बस्फोटांमधील मृतांची संख्या आता 85 इतकी झाली असून त्यात 13 अमेरिकन जवान आहेत ही बाब आज स्पष्ट झाली आहे. दरम्यान, इसिस या इस्लामिक दहशतवादी संघटनेने या स्फोटाची जबाबदारी स्वीकारली असल्याचे वृत्त आहे.
काल विमानतळाबाहेर दोन बॉम्बस्फोटांबरोबरच गोळीबाराचाही प्रकार घडला होता. घाईगडबडीने काबूलमधून बाहेर पडण्यासाठी विमानतळावर गर्दी केलेले अनेक जण यात बळी पडले आहेत. तेथे सुरक्षा बंदोबस्ताला असलेले अमेरिकन जवानही यात बळी पडल्याने अमेरिकेचे स्थानिक सुरक्षा अधिकारीही धास्तावलेले दिसून आले. ठार झालेल्यांमध्ये तालिबानचेही 28 जण आहेत असे सांगण्यात येते.
इसिस म्हणजेच इस्लामिक स्टेट ही संघटना तालिबान्यांच्याही विरोधातील संघटना मानली जाते. त्यांनी म्हटले आहे की आम्ही अमेरिकेसाठी ट्रान्स्लेटर म्हणून काम करणारे तसेच त्यांना मदत करणाऱ्यांना लक्ष्य करण्यासाठी हा हल्ला केला. अमेरिकेच्या सेंट्रल कमांडचे प्रमुख जनरल फ्रॅंक मॅकेन्झी यांनी म्हटले आहे की, आम्हाला आता अधिक हल्ल्यांसाठी तयार राहिले पाहिजे. आमच्या अफगाणिस्तानातील आस्थापनांवर रॉकेट हल्लेही होण्याचा धोका आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, जखमी झालेल्या 18 अमेरिकन सैनिकांनी विशेष विमानाने अफगाणिस्तानच्या बाहेर हलवले जात आहे, असेही अमेरिकन लष्कराकडून सांगण्यात आले.