प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 14 -राज्यातील गावठाणांची मोजणी अत्याधुनिक ड्रोन तंत्रज्ञानद्वारे करण्यात येत आहे. आतापर्यंत पुणे, सातारा, सांगली,सोलापूर आणि कोल्हापूर याच पाच जिल्ह्यांतील 793 गावठाणांची मोजणी पूर्ण करून 84 हजार 260 नागरिकांना प्रॉपर्टी कार्ड दिले आहे. स्वातंत्र्यानंतर 2000 पेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या गावठाणांमधील नागरिकांना पहिल्यांदाच घराच्या मालमत्तेचा पुरावा असलेले प्रॉपर्टी कार्ड देण्यात आले आहे.
गावाची वाढती लोकसंख्या, विकासाच्या निरनिराळ्या योजनांमुळे गावात भौगोलिक बदल होत असून, जमीन हस्तांतरण प्रक्रिया वेगाने होत आहे. गावठाण कार्यक्षेत्रातील बांधकाम परवाने देण्याचे अधिकार योग्य पद्धतीने हाताळण्यासाठी जागेचा नकाशा व गावठाणाचे भूमापन असणे आवश्यक आहे. मात्र ग्रामीण भागात गावठाणाचे अभिलेख नसल्यामुळे नेमकी जागा किती आहे, याबाबत सुस्पष्टता नसते. तसेच मालमत्तेचे मालकीपत्र नसल्यामुळे आर्थिक पतही निर्माण होत नाही. या सर्व पार्श्वभूमीवर आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने आणि गतीने जमीन मोजणीचे काम करण्याचा निर्णय भूमी अभिलेख विभागाने घेतला. त्यासाठी सर्व्हे ऑफ इंडियाच्या मदतीने ड्रोनचा वापर करुन जमीन मोजणी करण्यात येते.
2020 मध्ये ड्रोनद्वारे सर्वेक्षण करून गावठाणांमधील मिळकतींना प्रॉपर्टी कार्ड देण्याचे काम हाती घेण्यात आले. मात्र करोना संकटाच्या काळात हे काम काही दिवस थांबले होते. 2021 मध्ये पुन्हा या योजनेस गती देण्यात आली. त्यानुसार पुणे विभागात हे काम प्राधान्याने केले जात आहे.
पुणे जिल्ह्यातील 379 गावांमधील 29 हजार 216 नागरिकांना प्रॉपर्टी कार्ड देण्यात आले आहे. कोल्हापूरमधील 20 हजार 264 नागरिकांना, सांगलीमधील 11 हजार 425 नागरिकांना, सातारा जिल्ह्यातील 14 हजार 219 नागरिकांना तर सोलापूर जिल्ह्यातील 9 हजार 136 नागरिकांना प्रॉपर्टी कार्ड देण्यात आले आहे.
उर्वरित प्रॉपर्टी कार्ड दोन वर्षांत
दोन हजारांपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या पुणे विभागातील गावठाणांमधील नागरिकांना प्रॉपर्टी कार्ड देण्याचे काम प्राधान्याने करण्यात येत आहे. या योजनेमुळे नागरिकांना आपल्या घराचा मालकी हक्क असलेला कायदेशीर पुरावा मिळाला आहे. येत्या दोन वर्षांत उर्वरित गावांमधील नागरिकांना प्रॉपर्टी कार्ड देण्याचे नियोजन आहे. प्रॉपर्टी कार्डमुळे नागरिकांना घरांचा मालकी हक्क प्रस्थापित होणार असून, या घरांवर कर्ज घेणे शक्य होणार आहे, अशी माहिती भूमी अभिलेख विभागाचे पुणे प्रदेशचे उपसंचालक किशोर तवरेज यांनी दिली.
प्रॉपर्टी कार्डचे फायदे
गावठाणातील हद्दीचे वाद संपुष्टात येणार
सरकारी जमिनींचे संरक्षण करणे शक्य
गावाचा नियोजनबद्ध विकास होण्यास मदत
ग्रामपंचायतींना सुविधांसाठी जागा उपलब्धता
गावातील कर आकारणी सुुलभ