भारतीय क्रिकेट संघाने जिंकलेल्या 1983 च्या वर्ल्ड कपवर आधारलेला “83′ हा सिनेमा आता तमिळ आणि तेलगूमध्येही येणार आहे. कमल हासनची प्रॉडक्शन कंपनी राजकमल फिल्म्स इंटरनॅशनल आणि नागार्जुनची अन्नपूर्णा स्टुडिओजद्वारे सहकार्य केले जाणार आहे.
कमल हासन आणि नागार्जुन हे दोघेही दक्षिणेतले नावाजलेले कलाकार, निर्माते आणि वितरक आहेत. त्यांनी लॉंच केलेल्या सिनेमांना नेहमीच प्रेक्षकांबरोबर विश्लेषकांकडूनही कौतुक मिळते. “83’च्या तमिळ आवृत्तीसाठी कमल हासन यांनी
स्वतःहून पुढाकार घेतला आहे. “हा वर्ल्ड कप जिंकणे अतिशय आनंददायी होते. जिथे इच्छा आहे, तिथे विजय आहे, हेच या विजयातून सर्व देशवासियांनी
अनुभवले आहे.’
असे कमल हासन यांनी सांगितले. तर नागार्जुनच्या मते 83 च्या विजयामुळे भारतात क्रिकेट हा एक धर्म बनून गेला. ही एक विजयगाथा आहे आणि लोकांना सांगणे आवश्यक आहे. तेलगू “83′ साठी प्रमोशन आणि प्रॉडक्शन करण्याची संधी आपल्याला मिळाल्याबद्दल विशेष आनंद होत असल्याचेही नागार्जुनने सांगितले. कमल हासन आणि नागार्जुनद्वारे “83’ला दक्षिणेत मोठे यश मिळेल, असा विश्वास दिग्दर्शक कबीर खानने व्यक्त केला आहे.