रणवीर सिंग प्रमुख भुमिकेत असलेला 83 चित्रपट नुकताच प्रदर्शीत झाला आहे. हा चित्रपट 1983 च्या क्रिकेट विश्वचषकाचे विजेतेपद पटकवणार्या भारताच्या ऐतिहासिक विजयावर आधारित आहे. त्याकाळी भारत आयसीसी स्पर्धा जिंकेल अशी कोणालाच अपेक्षा नव्हती. मात्र, नवख्या कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने संपूर्ण क्रिकेट जगताला धक्का देत क्रिकेटचा नवा अध्याय लिहला. पहिल्या दोन विश्वचषक स्पर्धेत भारताला केवळ एकच सामना जिंकता आला होता. तरीही, प्रतिकुल परिस्थीतीवर मात करत भारताने लॉर्ड्सवरील अंतिम फेरीत बलाढ्य वेस्ट इंडिजला धुळ चारली.
1983 च्या विश्वचषकात भारताच्या विजयाने भारतीय क्रिकेट आणि जागतिक क्रिकेट कायमचे बदलले. सध्या या चित्रपटाची सर्वत्र चर्चा असल्याने आम्ही 83 चित्रपचाबद्दल काही खास गोष्टींचा उलगडा करत आहोत.
विश्वविजेते बलविंदर सिंग संधू चित्रपटाचे सहाय्यक दिग्दर्शक
भारताचे माजी वेगवान गोलंदाज बलविंदर सिंग संधू यांनी 1983 च्या विश्वचषक विजयात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अंतिम सामन्यात त्यांनी गॉर्डन ग्रीनिज यांचासारख्या दिग्गजला तंबूत धाडले होते. 83 चित्रपटाच्या तयारीमध्ये संधू देखील एक मोठा भाग होते. त्यांनी या चित्रपटातील सर्व कलाकारांना प्रशिक्षण दिले आहे. तसेच चित्रिकरणावेळी ते या कलाकारांच्या पथकासोबत होते. त्यांनी खेळाच्या सर्व गुंतागुंतींमध्ये कलाकारांना मार्गदर्शन केले. इतकेच नव्हे तर संधू चित्रपटाचे सहाय्यक दिग्दर्शक देखील आहेत.
हार्डी संधू भारताकडून अंडर-19 स्तरावर क्रिकेट खेळला
कबीर खान दिग्दर्शित 83 या चित्रपटात मदन लाल यांची भूमिका करणारा गायक आणि अभिनेता हार्डी संधू, त्याच्या तरुणपणी क्रिकेटपटू होता. संधू भारताकडून अंडर-17 आणि अंडर-19 स्तरावर क्रिकेट खेळला आहे. विशेष म्हणजे अंडर-17 स्तरावर खेळताना मदन लाल हार्डी संधूचे प्रशिक्षक होते.
कपिल देव यांच्या घरी रणवीर सिंगचा मुक्काम
83 चित्रपटातील प्रमुख अभिनेता रणवीर सिंगने कपिल देव यांच्या गोलंदाजी आणि फलंदाजी शैलीबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी त्यांच्या घरी 10 दिवस घालवले.
याबद्ध बोलताना रणवीर म्हणाला की, भारतातील दिग्गज व्यक्तीसोबत त्यांच्या घरी राहण्याची संधी मिळणे माझ्यासाठी सन्मानाची बाब आहे. साहजिकच, कपिल सरांची गोलंदाजी शैली आत्मसात करणे कठीण काम होते. त्यामुळे मला कपिल सरांबरोबर काही काळ एकत्र रहावे लागले.
चित्रपटाद्वारे विश्वविजेत्या खेळाडूंना मिळाले 15 कोटी रुपये
83 चित्रपटाच्या निर्मात्यांनी या कथेचे हक्क तब्बल 15 कोटी रुपयांना विकत घेतले आहेत. यामधील 5 कोटी रुपये कपिल देव यांना मिळाले. तर उर्वरित 10 कोटी रुपये इतर खेळाडूंमध्ये विभागन्यात आले.
1983 च्या विश्वचषकादरम्यान भारताला 1500 रुपये सामना मानधन आणि 600 रुपये दैनिक भत्ता मिळाला होता. भारताने विश्वचषक जिंकल्यानंतर, प्रसिद्ध गायिका लता मंगेशकर यांनी भारताच्या 1983 विश्वचषकाच्या नायकांसाठी निधी उभारण्यासाठी एका खास कार्यक्रम केला होता. नवी दिल्लीच्या इंद्रप्रस्थ स्टेडियममध्ये झालेल्या या कार्यक्रमातून 20 लाख रुपये जमा झाले आणि प्रत्येक संघ सदस्याला एक लाख मिळाले.
दिग्गज क्रिकेटपटूंच्या मुलांनी साकारल्या भूमिका
या चित्रपटात अनेक माजी क्रिकेटपटूंची मुले त्यांच्या प्रसिद्ध वडिलांच्या भूमिका साकारत आहेत. भारताचे माजी फलंदाज संदीप पाटील यांचा मुलगा चिराग पाटील वडिलांची भूमिका साकारत आहे हे सर्वज्ञात आहे. पण चित्रपटात भुमिका साकराणारा तो एकटाच क्रिकेटपटूचा मुलगा नाही. वेस्ट इंडिजचे माजी सलामीवीर गॉर्डन ग्रीनिज यांचा मुलगा कार्ल त्याच्या दिग्गज वडिलांच्या भुमिकेत आहे. माली मार्शल, जो दिवंगत वेस्ट इंडियन दिग्गज माल्कम मार्शलची भूमिका साकारत आहे. तसेच, वेस्ट इंडिजचे कर्णधार क्लाईव्ह लॉईड यांचा मुलगा जेसन हा वेगवान गोलंदाज जोएल गार्नरची व्यक्तिरेखा साकारत आहे. याशिवाय दिग्गज फलंदाज शिवनारायण चंद्रपॉलचा मुलगा लॅरी गोम्स यांच्या भूमिकेत आहे.