वाल्हे, (वार्ताहर) – पुरंदर तालुक्यातील 35 गावठाणसह, 321 वाड्या-वस्त्यांवर जवळपास 82 पाण्याचे टँकर सुरू आहेत. तालुक्यामध्ये पिण्याच्या पाण्यासोबतच, शेतीच्या आणि जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न शहरी, ग्रामीण भागात तीव्र होत आहे.
पावसाळा सुरू होऊन, तीन आठवडे उलटून गेल्यानंतर, पुरंदर तालुक्यातील दुष्काळाचे सावट दिवसेंदिवस गडद होताना दिसत आहे. पिण्यासाठी, पशुधनासाठी व शेतीसाठी लागणार्या पाणीबाबत मोठा प्रश्न नागरिकांसमोर उभा ठाकला आहे.
मागील वर्षी, अतिअल्प पर्जन्यमान झाले होता. शासनाकडून दुष्काळ जाहीर करण्यात आला होता. केंद्रस्तरीय समितीने दुष्काळाची दाहकताही तपासली;मात्र त्यावरील उपाययोजना कुठल्याही प्रकारच्या करण्यात आल्या नाहीत.
पुरंदर तालुक्यामध्ये प्रामुख्याने चारा छावण्या चालू कराव्यात, विविध गावांना पाण्याच्या टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा, चारा डेपो चालू करावेत तर तालुक्यातील बंद योजना त्वरित चालू करावे.
अशा विविध मागण्या दुष्काळग्रस्त भागातील नागरिकांनी शासनाकडे वारंवार केल्या होत्या. मात्र, संबंधित प्रशासनाकडून कोणतीही ठोस उपाय योजना करण्यात आली नसल्याने दाद मागायची कोणाकडे असा प्रश्न शेतकरी आणि नागरिकांसमोर उभा राहिला आहे.
धरण, विहिरी, ओढे-नाले कोरडेच
नाझरे, गराडे धरण कोरडेठाक पडले असून पावसाळा सुरू होऊनही अद्यापपर्यंत समाधानकारक पाऊस न पडल्याने धरण, विहीर, ओढे- नाले, तलाव कूपनलिका अद्यापपर्यंत कोरडेठाक आहेत.
टँकरची संख्या सातने कमी
पावसाळा सुरू होण्याआधी तालुक्यात एकूण 42 गावठाणसह 363 वाड्या-वस्त्यांवर 93 टँकरच्या माध्यमातून 288 खेपा सुरू होत्या. मात्र, पावसाळा सुरू झाल्यानंतर 42 गावांत सुरू असलेले 7 टँकरची संख्या कमी होऊन 35 झाली आहे.
363 वाड्या-वस्त्यांवर सुरू असलेले टँकर आता 321 वाड्या-वस्त्यांवर सुरू आहेत. सद्यःस्थितीत 82 टँकरच्या माध्यमातून 256 टँकरच्या खेपा सुरू आहेत, अशी माहिती पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागाकडून देण्यात आली आहे.
या ठिकाणी धावताहेत टँकर ?
सोनोरी, वाल्हे, वागदरवाडी, रीसे, पिसे, राजुरी, साकुर्डे, जवळार्जुन, दौंडज, दिवे, झेंडेवाडी, साकुर्डे, पांडेश्वर, खळद, बोपगाव, नायगाव, सुकलवाडी, पिंगोरी, दौंडज, आंबळे, सिंगापूर, गुर्हळी, राख, नावळी, मावडी कडेपठार, आडाचीवाडी, कुंभारवळण, एखतपूर, खानवडी आदींसह तालुक्यातील अनेक गावांत टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जात आहे.
पुरंदर तालुक्यात मागील वर्षी तसेच यावर्षीही पावसाळ्यात अत्यंत कमी पर्जन्यमान झाल्यामुळे आजअखेर 35 गावे व संबंधित वाड्यांना एकूण 82 टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.
मागील काही दिवसांपासून पावसाळा सुरू झाल्यानंतर 7 गावांतील 9 पाणीपुरवठा करणारे टँकर बंद झाले असून पुढील काळात समाधानकारक पाऊस झाल्यानंतर टँकरची संख्या कमी होईल. – सचिन घुबे, उप अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा उपविभाग, पुरंदर