महासंघाच्या इतिहासातील चुरशीची निवडणूक
पिंपरी (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड महापालिका कर्मचारी मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी शनिवारी (दि. 11) अत्यंत उत्स्फुर्तपणे मतदान झाले. महासंघाच्या इतिहासात पहिल्यांदाच अत्यंत चुरस निर्माण झाल्याने तब्बल 82 टक्के कर्मचाऱ्यांनी आपला मतदानाचा हक्क बजाविला. सायंकाळी सात वाजता मतमोजणीस सुरुवात झाली. मतमोजणीची प्रक्रिया किचकट असल्याने रात्री अकरा वाजेपर्यंत निम्मीच मतमोजणी झाली होती. मतमोजणीमध्येही उशीरापर्यंत चुरस पहावयास मिळाली.
पिंपरी-चिंचवड महापालिका कर्मचारी महासंघाची स्थापना 16 वर्षांपूर्वी करण्यात आली होती. सर्वच कर्मचारी आणि पदाधिकारी एकाच छत्राखाली असल्यामुळे आजपर्यंतच्या सर्व निवडणुका बिनविरोध झाल्या होत्या. कै. शंकरअण्णा गावडे यांच्यानंतर सध्याचे अध्यक्ष बबन झिंजुर्डे हे महासंघाची धुरा पहात होते. मात्र दीड वर्षापूर्वी अंतर्गत कलह निर्माण झाल्यामुळे आपला महासंघाचे पॅनलप्रमुख अंबर चिंचवडे यांनी न्यायालयात धाव घेत निवडणुकीची मागणी केली होती. न्यायालयाच्या आदेशानुसार शुक्रवारी गुप्त पद्धतीने मतदान पार पडले. मतदानासाठी 6 हजार 660 मतदार पात्र ठरले होते. शुक्रवारी सकाळी सात ते सायंकाळी 4 या वेळेत झालेल्या पात्र मतदारांपैकी तब्बल 81.43 टक्के मतदारांनी आपला हक्क बजाविला.
सकाळपासूनच कर्मचाऱ्यांनी महापालिकेच्या मुख्य कार्यालयासमोर गर्दी केली होती. तर दोन्ही पॅनलकडून सुट्टीचा दिवस असल्याने जास्तीत जास्त कर्मचाऱ्यांना मतदान करण्यासाठी आग्रहपूर्वक आणले जात होते. या निवडणुकीत बबन झिंजुर्डे विरुद्ध अंबर चिंचवडे अशीच लढत पहावयास मिळाली. मतदानानंतर दोन्ही पॅनलप्रमुखांनी विजयाचा दावा केला होता. पाच वाजता मतमोजणी सुरू होणे अपेक्षित असताना मतमोजणीला सात वाजता सुरुवात झाली. रात्री साडेदहा वाजेपर्यंत पन्नास टक्केच मतांची मोजणी पूर्ण झाली होती. मतमोजणीतही मोठी चुरस निर्माण झाल्याने निकालाची उत्सुकता ताणली गेली होती. रात्री अकराच्या सुमारासही सुमारे हजारहून अधिक महापालिका कर्मचारी व दोन्ही पॅनलचे उमेदवार व कार्यकर्ते मोठ्या संख्येने मतमोजणी केंद्राबाहेर उभे होते.