सातारा – कराडच्या कृष्णा मेडिकल कॉलेजमध्ये दाखल असणाऱ्या तीन संशयितांचा करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील करोनाग्रस्त रुग्णांची संख्या आता 21 झाली आहे. गुरूवारी निष्पन्न झालेल्या करोनाबाधितांमध्ये दोन पुरूष आणि एका महिलेचा समावेश आहे. जिल्ह्यातील 82 संशयितांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. त्यात कृष्णा मेडिकल कॉलेजमधील बुधवारी मृत झालेल्या 5 महिन्यांच्या बालकाचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. तर जिल्ह्यातील विविध विलगीकरण कक्षात 46 संशयितांना दाखल करण्यात आले आहे.
कराडच्या कृष्णा मेडिकल कॉलेजमध्ये दाखल असलेल्या करोनाबाधित रुग्णाच्या निकट सहवासातील 65 वर्षीय व 27 वर्षीय पुरुषांचे आणि 43 वर्षीय महिलेचा करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली. त्यामुळे सातारा जिल्ह्यातील करोना रुग्णांची संख्या आता 21 झाली आहे. त्यापैकी आतापर्यंत 3 रुग्ण मुक्त होऊन रुग्णालयातून सोडले आहेत तर दोघांचा मृत्यू झाला आहे.
क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा सर्वसाधारण रुग्णालयातील 21, कृष्णा मेडिकल कॉलेजमधील 32, कोरेगावच्या ग्रामीण रुग्णालयातील 6, कराडच्या उपजिल्हा रुग्णालयातील 12 व फलटणच्या 11 अशा एकूण 82 संशयितांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असल्याचे पुण्याच्या बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाने कळविले आहे. कृष्णा मेडिकल कॉलेजमधील मृत झालेल्या 5 महिन्याच्या बालकाचा अहवाल निगेटिव्ह असल्याचेही कळविण्यात आले आहे.तर कृष्णा मेडिकल कॉलेजमधील 4 व कोरेगावच्या ग्रामीण रुग्णालयातील 1 अशा पाच नागरिकांचे अहवाल अनिर्णित असल्याचे बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाने कळविले आहे.
क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा सर्वसाधारण रुग्णालयात संशयित म्हणून 22, कृष्णा मेडिकल कॉलेजमध्ये 5, कराडच्या उपजिल्हा रुग्णालयात 19 अशा 36 संशयितांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. या सर्वांच्या घशातील स्त्रावांचे नमुने बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. सध्या दाखल असणाऱ्या 2 बाधित रुग्णांचे 14 दिवसांनंतर तपासणीसाठी पाठविण्यात आलेले नमुने दोन दिवसापूर्वी पॉझिटिव्ह असल्याने 48 तासांनी पुनर्तपासणीकरिता बी. जे. वैद्यकीय महाविद्यलयाकडे पाठविण्यात येत आहे, अशी माहितीही डॉ. गडीकर यांनी दिली.