बिहारमधील 81 टक्के नवनिर्वाचित आमदार करोडपती

दोन-तृतीयांश जणांविरोधात विविध प्रकारचे गुन्हे

नवी दिल्ली – बिहारमधील 81 टक्के नवनिर्वाचित आमदार करोडपती आहेत. नवनिर्वाचित आमदारांपैकी जवळपास दोन-तृतीयांश जणांविरोधात आधीपासूनच विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत.

बिहारमध्ये विधानसभेचे एकूण 243 आमदार आहेत. त्यातील 241 जणांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रांची छाननी असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (एडीआर) या संस्थेकडून करण्यात आली. त्या संस्थेने दिलेल्या अहवालानुसार बिहारमधील करोडपती आमदारांची संख्या वाढली आहे. मागील निवडणुकीत (2015) विजयी झालेले 67 टक्के म्हणजे 162 आमदार करोडपती होते.

यावेळी करोडपती आमदारांची संख्या वाढून 194 इतकी झाली आहे. भाजपच्या सर्वांधिक 65 आमदारांकडे 1 कोटी रूपयांपेक्षा अधिक मुल्याची संपत्ती आहे. राजदचे 64, जेडीयूचे 38, तर कॉंग्रेसचे 14 आमदार करोडपती आहेत.

नवनिर्वाचित आमदारांपैकी 163 म्हजणे 68 टक्के जणांविरोधात विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. नव्याने निवडून आलेल्या आमदारांपैकी निम्म्या म्हणजे 123 जणांविरोधात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांमध्ये खून, खुनाचा प्रयत्न, अपहरण आणि महिलाविरोधी गुन्ह्यांचा समावेश आहे. राजदच्या सर्वांधिक 54 तर त्याखालोखाल भाजपच्या 47 आमदारांविरोधात विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत.

नवनिर्वाचित आमदारांपैकी एक-तृतीयांश म्हणजे 82 जणांनी पाचवी ते बारावीपर्यंतचे शिक्षण घेतले आहे. तर 62 टक्के म्हणजे 149 आमदार पदवीधर किंवा उच्चशिक्षित आहेत. बिहारमधील 115 नवनिर्वाचित आमदार (48 टक्के) 25 ते 50 वर्षे वयोगटातील आहेत. तर, 52 टक्के म्हणजेच 126 आमदारांचे वय 51 ते 80 वर्षांदरम्यान आहे. यावेळी बिहार विधानसभेवर निवडून गेलेल्यांमध्ये 26 महिलांचा समावेश आहे. महिला आमदारांचे प्रमाण एकूणात 11 टक्के इतके आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.