आरेतून स्थलांतरित केलेली तब्बल 800 झाडे मृतावस्थेत

मुंबई- मेट्रोच्या आरेतील प्रस्तावित कारशेडसाठी रात्री करण्यात आलेल्या झाडांच्या कत्तलीवरुन सरकार आणि मेट्रो प्रशासनावर जोरदार टीका झाली होती. यानंतर आता मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडकडून (एमएमआरसीएल) स्थलांतरित केलेल्या झाडांबद्दलची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

आरेमधील 1800 झाडांचे स्थलांतरित केल्याचा दावा एमएमआरसीएलने केला होता. मात्र यापैकी तब्बल 800 झाडे मृतावस्थेत असल्याचे भीषण वास्तव समोर आले आहे. प्रस्तावित कारशेडच्या जागेवरील 1800 झाडे स्थलांतरित केल्याचा एमएमआरसीएलचा दावा आहे. मुंबईतील विविध ठिकाणांसह आरे आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात झाडांचे स्थलांतर केल्याची माहिती एमएमआरसीएलने दिली होती.

मात्र यापैकी 800 झाडे मृतावस्थेत असल्याचे समजते. झाडांचे स्थलांतर करताना आणि स्थलांतर पूर्ण झाल्यावर त्यांची योग्य काळजी घेण्यात येईल, असे एमएमआरसीएलकडून सांगण्यात आले होते. मात्र तसे काहीच घडले नसल्याचे झाडांच्या अवस्थेवरुन दिसत आहे.

आरेतील प्रस्तावित कारशेडच्या जागेवरुन आरे कॉलनीमध्येच स्थलांतरित करण्यात आलेल्या झाडांची पाहणी करण्यात आली. यावेळी स्थलांतरित करण्यात आलेल्या झाडांवर एक लॅमिनेशन करण्यात आलेला कागद दिसला. त्यावर झाडाचा क्रमांक आणि ते कुठून स्थलांतरित करण्यात आले, याचा तपशील होता. लॅमिनेशन करण्यात आलेला कागद लावण्यात आलेली काही झाडे चांगल्या स्थितीत आहेत. मात्र बहुतांश झाडे मृतावस्थेत आहेत.

स्थलांतरित करण्यात आलेली काही झाडे सुकून गेली आहेत. तर काही झाडांच्या फांद्यांवर एकही पान शिल्लक राहिलेले नाही. अनेक झाडे मृतावस्थेत आहेत. त्यामुळे आरेतील झाडांचे स्थलांतर करुन एमएमआरसीएलने त्यांची हत्या केल्याचा आरोप पर्यावरणप्रेमींनी केला आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)