पिंपरी – डॉ. डी. वाय पाटील वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय व संशोधन केंद्रातील कोविड रुग्णालयामध्ये 80 वर्षीय आजोबांनी करोनावर मात केली.
मोरवाडी, पिंपरी येथील रहिवाशी असलेल्या आजोबांना 6 जुलै रोजी डॉ. डी. वाय पाटील रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्या आजोबांना श्वास घेण्यास अडचण येत होती. शरीरातील ऑक्सिजन पातळी कमी असल्याने ऑक्सिजन लावण्यात आले. तपासण्या केल्या असता त्यांना न्यूमोनिया असल्याचे आढळून आले. त्यांची करोना चाचणी केली असता ती पॉझिटिव्ह आली. त्यांना उच्च रक्तदाब, मधुमेहाचा त्रास आहे. या परिस्थितीत त्यांच्यावर उपचार करणे फारच जोखमीचे होते. त्वरित त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु केले.
सात दिवसांत प्रकृतीत हळू हळू सुधारणा होत असल्याचे दिसून आले. या उपचारांना त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. आता त्यांची प्रकृती स्थिर असून ते करोनामुक्त झाले आहेत, अशी माहिती श्वसन विकार विभागाचे प्रमुख व कोविड रुग्णालयाचे मुख्य समन्वयक ब्रिगेडियर (नि) डॉ. एम.एस.बरथवाल यांनी दिली.
बरथवाल यांनी सांगितले की, या संपूर्ण प्रक्रियेत आयसीयूचे तज्ज्ञ डॉक्टर, निवासी डॉक्टर, भूलतज्ज्ञ, यांचे मोलाचे योगदान होते. सात दिवसांच्या यशस्वी उपचारांनंतर ते आज व्हेंटिलेटरवरून बाहेर येऊ शकले. जागतिक दर्जाची अद्ययावत सुविधा उपलब्ध असल्याने हे शक्य झाले, असे त्यांनी नमूद केले. कुलपती डॉ. पी. डी. पाटील, विद्यापीठ सोसायटीच्या उपाध्यक्षा डॉ. भाग्यश्री पाटील, सचिव डॉ. सोमनाथ पाटील, विश्वस्त डॉ. स्मिता जाधव, विश्वस्त व कोषाध्यक्ष डॉ. यशराज पाटील, अधिष्ठाता डॉ. जे.एस.भवाळकर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. एच.एच.चव्हाण यांनी सर्व डॉक्टर, परिचारिका, कर्मचारी वर्गाचे कौतुक केले आहे.