भाजप मंत्र्यांच्या संपत्तीत 80 टक्के वाढ

पुन्हा तिकीटे मिळालेल्या 18 मंत्र्यांची एकूण संपत्ती 142 कोटींनी वाढली

मुंबई – भारतीय जनता पक्षाने ज्या 18 मंत्र्यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे त्या मंत्र्यांच्या एकूण संपत्तीत गेल्या पाच वर्षात 80 टक्के इतकी वाढ झाली आहे. एका स्वयंसेवी संस्थेने या मंत्र्यांनी उमेदवारी अर्जाबरोबर आपल्या संपत्तीचे जे विवरण सादर केले आहे त्याची माहिती संकलीत करून हा निष्कर्ष काढला आहे.

सन 2014 मधे या मंत्र्यांची संपत्ती 179 कोटी 80 लाख इतकी होती ती आता पाच वर्षांनी 322 कोटी 50 लाख इतकी झाली आहे. मंत्र्यांनी आपली ही संपत्ती अधिकृतपणे दाखवली आहे. ही वाढ 88 टक्के इतकी आहे. प्रजा फाऊंडेशन या संस्थेने ही माहिती दिली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की या 18 मंत्र्यांमध्ये संपत्तीतील सर्वाधिक वाढ ही बबनराव लोणीकर यांची झाली आहे.

गेल्या पाच वर्षात त्यांची संपत्ती 27 कोटी 10 लाखांनी वाढली आहे. पंकजा मुंडे यांच्या संपत्तीत 21 कोटी 70 लाखांची वाढ झाली आहे. पुण्यातील कोथरूड मधील भाजपचे उमेदवार व भाजपचे महत्वाचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या संपत्तीतही मोठीवाढ झाल्याचे यात नमूद करण्यात आले आहे.

सन 2014 मध्ये चंद्रकांत पाटील यांची संपत्ती 3 कोटी 2 लाख रूपये इतकी होती ती आता 29 कोटी 3 लाख रूपये इतकी झाली आहे. सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या संपत्तीत गेल्या पाच वर्षात 16 कोटी 60 लाख रूपये तर शिवसेनेचे मंत्री जयदत्त क्षिरसागर यांच्या संपत्तीत 13 कोटी रूपयांची वाढ झाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.