नवी दिल्ली – नोटबंदीच्या निर्णयाला शुक्रवारी ८ वर्षांचा कालावधी पूर्ण झाला. त्या घडामोडीचा संदर्भ घेऊन विरोधकांनी केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबर २०१६ यादिवशी नोटबंदीची घोषणा केली. त्यामुळे ५०० आणि १ हजार रूपये मुल्याच्या नोटा चलनातून बाद झाल्या.
भ्रष्टाचार आणि काळ्या पैशावर नियंत्रण ठेवण्यासाठी रोख व्यवहार कमी करणे आणि डिजिटल अर्थव्यवस्थेला चालना देणे या उद्देशातून संबंधित निर्णय घेतल्याचे सरकारकडून सांगण्यात आले. त्या निर्णयाची आठवण करून देत विरोधकांनी प्रतिक्रिया दिल्या. नोटबंदीनंतरही देशात आज आधीपेक्षाही अधिक रोकड वापरली जात आहे.
त्या निर्णयाने सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगांवर आणि असंघटित क्षेत्रावर प्रतिकूल परिणाम झाला. तसेच, मक्तेदारीचा मार्ग मोकळा झाला, असे टीकास्त्र लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सोडले.
भारतीय अर्थव्यवस्थेच्या इतिहासात नोटबंदीचा उल्लेख काळा अध्याय म्हणून होईल. भाजपने अर्थव्यवस्थेचे रूपांतर अनर्थव्यवस्थेत केले. डॉलरच्या तुलनेत रूपयाची घसरण नीचांकी पातळीवर झाली आहे, असे समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी म्हटले. नोटबंदीनंतर नोटा जमा करण्यासाठी, बदलून घेण्यासाठी बँकांबाहेर मोठ्या रांगा लागल्या. त्यावेळी काही जण दगावल्याच्या घटना घडल्या. त्याचा संदर्भ देऊन राजदचे नेते तेजस्वी यादव यांनी मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहिली.