थिरूवनंतपुरम – इंग्लंडहून आलेले आठ प्रवाशांना करोनाची बाधा झाल्याचे आढळले आहे. त्यांच्या विषाणूमध्ये काही प्रमाणात बदल झाल्याचे दिसत आहे. मात्र, ब्रिटनमध्ये सापडलेल्या नव्या स्वरूपाच्या विषाणूत आणि त्यांत साम्य नसल्याचे केरळच्या आरोग्यमंत्री के. के. शैलजा यांनी शनिवारी सांगितले.
या सर्व बाधितांचे नमुने पुढील तपासणीसाठी पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजीकडे पाठवले आहेत. तेथून अहवाल आल्यानंतर हा इंग्लंडमध्ये सापडलेल्या विषाणूंशी साधर्म्य असणारा आहे का? याबाबत नेमकेपणाने भाष्य करता येईल, असे त्या म्हणाल्या.
कोझीकोडे येथे स्थापन केलेल्या संशोधन संस्थेत या विषाणूत काही प्रमाणात बदल असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे केरळमधील सर्व जिल्ह्यात अशा स्वरूपाचे संशोधन करत आहोत. करोनाची दुसरी लाट येऊ नये म्हणून राज्यातील सर्व चारही विमानतळांवर सावधगिरी बाळगण्यात येत आहे. परदेशांतून आलेल्या प्रवाशांची काटेकोरपणे तपासणी करण्यात येत आहे.