नवी दिल्ली – बीसीसीआयने आगामी दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारताचा कसोटी संघ बुधवारी जाहीर केला. अनेक अपेक्षित निर्णय घेत संघाची घोषणा करण्यात आली. अजिंक्य रहाणेकडून कसोटी संघाचे उपकर्णधारपद काढून घेण्यात येऊन ती जबाबदारी हिटमॅन रोहित शर्माकडे सोपवण्यात आली आहे. तसेच विराट कोहलीच्या जागी रोहितकडेच भारताच्या एकदिवसीय संघाचे नेतृत्वही देण्यात आले आहे.
– एकदिवसीय नेतृत्वही कोहलीऐवजी रोहितकडेच
– रोहितकडे कसोटी संघाचे उपकर्णधारपद
– संघातील स्थान वाचले, पण कसोटी उपकर्णधारपद रहाणेने गमावले
– जडेजा, गिल व पटेलला दुखापतीमुळे वगळले
– चेतेश्वर पुजारालाही दिली एक संधी
– एकदिवसीय संघाची घोषणाही लवकरच होणार
रोहितकडे एकदिवसीय संघाचे कर्णधारपद 2023 साली होत असलेल्या एकदिवसीय सामन्यांच्या विश्वकरंडक स्पर्धेपर्यंत राहणार आहे. अजिंक्य रहाणेकडून कसोटी संघाचे उपकर्णधारपद काढून घेतले जाणार याचे संकेत बीसीसीआयने दिलेच होते तसेच घडले.
मधल्या फळीतील फलंदाज हनुमा विहारी याचेही कसोटी संघातील स्थान कायम राहिले असून, वेगवान गोलंदाज इशांत शर्माचे संघातील स्थान आश्चर्यकारकरित्या कायम राहिले आहे.
भारताचा कसोटी संघ – विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), लोकेश राहुल, मयंक आग्रवाल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), वृद्धिमान साहा (अतिरिक्त यष्टीरक्षक), रवीचंद्रन अश्विन, जयंत यादव, इशांत शर्मा, महंमद शमी, उमेश यादव, जसप्रीत बुमराह, शार्दूल ठाकूर, महंमद सिराज.
राखीव ः नवदीप सैनी, सौरभ कुमार, दीपक चहर, अर्झान नागवासवाला.