कर्नाटकातील भीषण स्फोटात 8 मजुरांचा मृत्यू; रस्त्याला पडल्या भेगा

बंगळुरु : कर्नाटकातील शिवमोगा जिल्ह्यामध्ये गुरुवारी रात्री एक मोठा स्फोट झाल्याची घटना समोर आली आहे. स्फोटकांनी भरेलल्या एका ट्रकमध्ये हा स्फोट झाला. ज्यामुळे या अपघातात 8 मजुरांचा मृत्यू झाला आहे. स्फोटाचे स्वरुप इतके मोठे होते, की आजुबाजूच्या परिसरातही याचा हादरा जाणवला. इतकेच नव्हे तर, या शक्तिशाली स्फोटामुळे रस्त्यालाही भेगा गेल्या.

नजीकच्या परिसरात असणाऱ्या घरांच्या आणि कार्यालयांच्या काचाही या स्फोटच्या हादऱ्यामुळे तुटल्या. दरम्यान, या अपघातामध्ये मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, खोदकामासाठी ही स्फोटके नेण्यात येत होती. त्याचवेळी दगड तोडण्याच्या ठिकाणी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास एक मोठा स्फोट झाला. या स्फोटामुळे फक्त शिवमोगाच नव्हे, तर चिक्कमंगळुरू आणि दावणगेरे या जिल्ह्यांमध्येही याचे हादरे जाणवले. स्फोटाचे स्वरुप भीषण असल्याची प्रतिक्रिया स्थानिकांनी दिली आहे.

सोशल मीडियावरही याबाबतची माहिती काही युजर्सनी पोस्ट केली. प्रथमत: इथे भूकंप आला, असंच अनेकांना वाटले ज्यानंतर भूगर्भ शास्त्रज्ञांशीही संपर्क साधण्यात आला होता. पण, हा भूकंप नसून एक भीषण स्फोट होता. पोलिसांच्या माहितीनुसार हा स्फोट जिलेटीन नेणाऱ्या एका ट्रकमध्ये झाला. ज्यामुळे ट्रकमधील सर्व मजुरांचा मृत्यू झाला.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.