जेरुसलेम – जेरुसलेम शहराच्या जून्या भागातील एका बसवर आज एका व्यक्तीने केलेल्या गोळीबारात किमान 8 जण जखमी झाले. हा हल्ला एखाद्या पॅलेस्टिनी व्यक्तीने केल्याचा संशय आहे. इस्रायल आणि गाझामधील दहशतवाद्यांदरम्यान संघर्ष भडकल्याच्या आठवड्याभरानंतर लगेचच हा गोळीबार झाला आहे.
गोळीबारात जखमी झालेल्यांपैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. याशिवाय जखमींमध्ये दोन गर्भवती महिलांचाही समावेश आहे. एका व्यक्तीच्या डोक्यात आणि मानेला गोळी लागली आहे, असे इस्रायलमधील रुग्णालयातील उपचार करणाऱ्या पथकांच्या सूत्रांनी सांगितले. ज्यूंचे प्रार्थनास्थळ असलेल्या वेस्टर्न वॉल येथे ही बस थांबली असताना हा गोळीबार झाला.
हल्लेखोराचा शोध घेण्यासाठी अधिकारी रवाना करण्यात आले आहेत. जवळच्या सिवान येथे पॅलेस्टिनींची वस्ती आहे. तेथेही तपास अधिकारी रवाना करण्यात आले आहेत.