8 तोळे दागिने, 20 हजार रोख परत; घडविले प्रामाणिकपणाचे दर्शन

वाघोलीतील नागरिकाकडून प्रामाणिकपणाचे दर्शन : वाघेश्वर मंदिर चौकातील घटना

वाघोली- रिक्षातून प्रवास करीत असताना उबाळेनगर येथील महिलेची वाघोली येथील वाघेश्‍वर मंदिर चौकात पडलेल्या पर्समधील 8 तोळ्याचे दागिने व 20 हजार रुपये रोख रक्‍कम वाघोलीतील एका प्रामाणिक व्यक्तीने परत करून प्रामाणिकपणाचे दर्शन घडविले.

तुकाराम सलगर (रा. बाईफ रोड, घनश्‍याम सातव यांची रूम) असे महिलेची पर्स व त्यातील ऐवज परत करणाऱ्या व्यक्‍तीचे नाव आहे. उबाळेनगर येथील मेघा यादव या सोमवारी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास वाघोली गावात राहणाऱ्या मुलीला भेटण्यासाठी रिक्षाने जात होत्या. प्रवासामध्ये त्यांची पर्स गहाळ झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी घरी पुन्हा जाऊन तपासले असता त्यांना पर्स मिळाली नाही. वाघेश्वर चौक येथे वाहतूक कोंडी असताना तेथून जाणारे तुकाराम सलगर यांना ही पर्स मिळाली. पर्समधील मोबाइलवर फोन येत होता.

मात्र, सलगर यांना फोनबाबत समजत नसल्याने त्यांनी घनश्‍याम सातव यांच्याशी संपर्क साधून पर्स व त्यामध्ये असणारे रोख रक्‍कम व दागिन्यांविषयी सांगितले. सातव यांनी पर्समधील फोनद्वारे मेघा यादव यांचे नातेवाईक सीमा यादव व आनंद यादव यांच्याशी संपर्क साधला.

ओळख पटवून पर्समधील सर्व साहित्य सुखरूप यादव कुटुंबीयांच्या हवाली केले. सलगर यांनी दाखविलेल्या प्रामाणिकपणामुळे यादव कुटुंबीयांचे मौल्यवान साहित्य त्यांना परत मिळाल्याने त्यांचे आभार मानले. तुकाराम सलगर यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक वाघोली परिसरातून केले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)