“मातृवंदना’पासून 79 टक्‍के माता वंचित

अवघ्या 21 टक्‍के मातांना योजनेचा लाभ : जागतिक आरोग्य संघटनेचे सूत्र ठरतेय अडसर
-प्रकाश गायकर
पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरात 2017 पासून 77 हजार 807 महिलांची प्रसूती झाली. त्यापैकी अवघ्या 16 हजार 807 म्हणजेच 21 टक्के महिलांना मातृवंदना योजनेचा लाभ मिळाला आहे. बाकी 79 टक्के माता या योजनेपासून वंचित राहिल्याची धक्‍कादायक माहिती समोर आली आहे.

गर्भवती महिलांमधील कुपोषणाचे प्रमाण कमी व्हावे आणि बाळ सदृढ जन्माला यावे, यासाठी केंद्र सरकारच्या वतीने “मातृ वंदना’ योजना सुरू करण्यात आली. यामध्ये पहिल्या अपत्यावेळी गर्भवती महिलेला सकस आहार घेण्यासाठी पाच हजार रुपये अनुदान दिले जाते. 1 जानेवारी 2017 पासून केंद्र सरकारने ही योजना सुरू केली. पूर्वी इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना या नावाने ही योजना सुरू होती. यामध्ये दारिद्रय रेषेखालील व असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना या योजनेचा लाभ दिला जात होता. या लाभाची रक्कम सहा हजार रुपये होती. मात्र जानेवारी 2017 पासून ही रक्कम पाच हजार रुपये करण्यात आली. तसेच सरसकट सर्व मातांना या योजनेचा लाभ देण्याचा स्वागतार्ह निर्णय घेतला. मात्र जागतिक आरोग्य संघटनेने यासाठी सूत्र ठरवून दिले.

मातृ वंदना योजनेच्या लाभासाठी प्रत्येक शहर व जिल्ह्याला उद्दिष्ट ठरवून देण्यात आले आहे. त्यानुसार 2017 ते 2020 हा उद्दिष्ट पूर्ण करण्याचा कालावधी ठेवण्यात आला आहे. पिंपरी चिंचवड शहरात 25 हजार 450 महिलांना या योजनेचा लाभ देण्याचे उद्दिष्ट सरकारने ठेवले होते. त्यापैकी 16 हजार 807 मातांना या योजनेचा लाभ देण्यात आला आहे. त्यानुसार, याची टक्केवारी 66 एवढी होत आहे. मात्र वास्तविक शहरातील प्रसूतीचा आकडा 77 हजारांवर पोहचला आहे. म्हणजेच प्रसूतीच्या तुलनेत केवळ 21 टक्के महिलांना या योजनेचा लाभ झाला आहे. उर्वरित 79 टक्के महिला या योजनेपासून वंचित राहिल्याचे वास्तव आहे.

जागतिक आरोग्य संघटनेचे निकष
जागतिक आरोग्य संघटनेने मातृवंदना योजनेच्या लाभार्थ्यांसाठी निकष ठेवले आहेत. प्रथम अपत्य असणाऱ्या 100 महिलांपैकी फक्त 53 महिलांनाच योजनेचा लाभ देण्यात यावा. या सूत्रानुसार, पिंपरी चिंचवड शहरातील 2017 ते 2020 या कालावधीत फक्त 25 हजार 450 महिलाच या योजनेचा लाभ घेऊ शकतात. पूर्वी असलेली गरीब व असंघटीत क्षेत्रातील महिलांसाठीची अट रद्द करून सरसकट या योजनेचा लाभ देण्याचा निर्णय घेतला. मात्र जागतिक आरोग्य संघटनेच्या निकषामुळे प्रसूतीची संख्या वाढूनही उद्दिष्टापेक्षा जास्त महिलांना या योजनेचा लाभ मिळत नाही.

काय आहे मातृवंदना योजना?
केंद्र सरकारने प्रधानमंत्री मातृवंदना योजना सुरू केली आहे. यामध्ये महिलेला पहिल्या अपत्यावेळी सकस आहार घेण्यासाठी पाच हजार रुपये अनुदान दिले जाते. त्यामध्ये लाभार्थी महिलेने कागदपत्रांची पूर्तता केल्यावर लाभ दिला जातो. गरोदरपणाची नोंद 100 दिवसांच्या आत केल्यास पहिला हप्ता एक हजार रुपये बॅंक खात्यावर जमा होतो. त्यानंतर गरोदरपणाच्या सहा महिन्यांनी एक प्रसूतीपूर्व तपासणी केल्यावर दुसरा हप्ता दोन हजार रुपये जमा होतात. तर प्रसूतीनंतर बाळाच्या जन्माची नोंद, बीसीजी व ओपीव्ही डोस दिल्यावर उर्वरित दोन हजार रुपये जमा होतात.

सरकारने दिलेल्या उद्दिष्टपूर्तीकडे वाटचाल सुरू आहे. मातृ वंदना योजनेसाठी अनेक निकष लागू आहेत. योग्य महिलेच्या बॅंक खात्यामध्येच रक्कम जमा व्हावी यासाठी प्रयत्नशील आहे. त्यामुळे थोडा अवधी लागतो.
– डॉ. पवन साळवे, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी, महापालिका.

Leave A Reply

Your email address will not be published.