मुंबई : राज्यातील करोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून त्यात आज तब्बल 778 नवीन रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे राज्यातील एकूण रुग्णांची संख्या 6427 वर पोहोचली, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. तर आज दिवसभरात आणखी 14 रुग्णांचा मृत्यू झाल्याने संख्या आता 283 झाली आहे.
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 96,369 नमुन्यांपैकी 89,561 जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर 6427 जण पॉझिटिव्ह आले आहेत. तसेच आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबईतील 6, पुण्यातील 5, नवी मुंबई, नंदूरबार आणि धुळे येथील प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे राज्यात आतापर्यंत 840 जण पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.
आज झालेल्या मृत्यूंपैकी 8 पुरुष, तर 6 महिला आहेत. आज झालेल्या 14 मृत्यूपैकी 60 वर्षे किंवा त्यावरील 2 रुग्ण आहेत. तर 9 रुग्ण हे वय वर्षे 40 ते 59 या वयोगटातील आहेत. तर 3 रुग्ण 40 वर्षांखालील आहे. दोन रुग्णांबाबत इतर आजाराची माहिती अद्याप मिळू शकली नाही. उर्वरित 12 मृत्यूंपैकी 7 रुग्णांमध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.
राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या 477 कंटेनमेंट झोन क्रियाशील असून आज एकूण 7491 सर्वेक्षण पथकांनी काम केले असून त्यांनी 27.26 लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे.