गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत होणार कुंवरसिंह विजयोत्सव, पाकिस्तानाचा विक्रम मोडणार
पाटणा – 1857 मध्ये देशाच्या स्वातंत्र्यासाठी झालेल्या क्रांतीच्यावेळी भोजपूर जिल्ह्यात बाबू वीर कुंवरसिंह यांनी इंग्रजांवर विजय मिळवल्याच्या स्मृत्यर्थ दरवर्षी विजयोत्सव साजरा केला जातो. यंदा देशाला स्वातंत्र्य मिळाल्याच्या घटनेचे अमृतमहोत्सवी वर्ष असल्याने भोजपूर जिल्ह्यातील जगदीशपूर येथे उद्या होणाऱ्या विशेष कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उपस्थित राहणार आहेत.
जगदीशपूर येथील कुंवरसिंह यांचा किल्ला हे या कार्यक्रमाचे केंद्रस्थान असले तरी त्याठिकाणी जागेची मर्यादा असल्याने किल्ल्यापासून दोन किलोमीटर अंतरावरील आरा-मोहनियाँ रस्त्यावरील दुलौर गावात हा कार्यक्रम होणार आहे. यावेळी अमित शहा यांच्या उपस्थितीत एकाचवेळी 75 हजार तिरंगी झेंडे फडकावण्याचा विक्रम करण्यात येणार आहे. याआधी एकाचवेळी 57,500 राष्ट्रध्वज फडकवाण्याचा विक्रम पाकिस्तानच्या नावावर आहे. तो उद्या मोडला जाईल.
1857 मध्ये झालेल्या क्रांतीच्या वेळी बिहारमधील त्यावेळचे जमीनदार बाबू वीर कुंवरसिंह यांनी इंग्रजांचे दात घशात घातले होते. काही काळासाठी स्वतःचे राज्य इंग्रजांपासून स्वतंत्र करण्यातही त्यांना यश प्राप्त झाले होते. त्यावेळच्या युद्धात जखमी झाल्याने काही काळाने त्यांचे निधन झाले. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दरवर्षी जगदीशपूरच्या किल्ल्यात विजयोत्सव साजरा केला जातो.
यंदा हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात करण्यात येत असल्याने किल्ल्यावर केवळ पुष्पहार अर्पण करून मुख्य कार्यक्रम दुलौर गावांत होणार आहे. या कार्यक्रमाच्या ठिकाणी प्रवेश करताच प्रत्येक नागरिकाला राष्ट्रध्वज दिला जाणार आहे. हे राष्ट्रध्वज पाटणा आणि अन्य शहरांमध्ये तयार करून आणण्यात आले आहेत तर त्यासाठी लागणाऱ्या काठ्या आसाममधून मागवण्यात आल्या आहेत.