इंदापुरात मतदानासह चुरसही वाढली

तालुक्‍यात 329 मतदान केंद्रावर 75 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त मतदान

रेडा – इंदापूर विधानसभा मतदारसंघामध्ये 75 टक्‍यांपेक्षा जास्त मतदान झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी प्रवीण साळुंखे यांनी दिली. मतदान वाढल्याने चुरसही वाढली आहे. इंदापूर तालुक्‍यातील 329 मतदान केंद्रावर मतदान घेण्यात आले, पावसाने सकाळी दहापर्यंत हजेरी लावल्याने निवडणुकीच्या मतदानाचा टक्का कमी होणार, अशी शंका व्यक्त करण्यात येत होती. मात्र, सकाळी दहानंतर पाऊस बंद होवून दिवसभर ऊन पडले. त्यामुळे मतदान केंद्रावर मतदारांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती, असे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी सोनाली मेटकरी यांनी सांगितले.

सकाळी 7 वाजता मतदानाला सुरवात करण्यात आले, त्यानंतर सकाळी 9 वाजता केवळ 6.3 टक्के मतदान झाले, 11 वाजता 19 .77 टक्के, दुपारी 1 वाजता 37.31 टक्के, 3 वाजता 54 . 62 टक्के, सायंकाळी 5 वाजता 69 . 77 टक्के तर व सायंकाळी 6 वाजता 69 .77 टक्केच मतदान होते. त्यानंतर मात्र मतदारांचा ओघ वाढल्याने सायंकाळी 7 वाजेपर्यंत एक तास मतदानाची वेळ वाढविण्यात आली. अखेर सायंकाळी उशीरा इंदापूर तालुक्‍यातून एकूण 75 टक्‍यांपेक्षा जास्त मतदान झाले आहे.

इंदापूर तालुक्‍यामध्ये चौदाव्या विधानसभा निवडणुकीसाठी तरूणांचा प्रचंड प्रतिसाद लाभल्याने टक्केवारीत वाढ झाली आहे, प्रत्येक मतदान केंद्रावर तरूणांनी मतदानासाठी सकाळच्या प्रहरापासून एकच गर्दी केली होती. संपूर्ण तालुक्‍यात सर्व मतदान केंद्रावर शांततेत मतदान पार पडले, इंदापूर शहरातील अकलूज नाका येथील रयत शाळेच्या मतदान केंद्रावर थोडी गडबड झाल्याचे पोलिसांना समजले, त्यानंतर वातावरण गढूळ होण्याअगोदर पोलीस निरीक्षक मधुकर पवार यांनी प्रकरण मिटवले.

Leave A Reply

Your email address will not be published.