जुन्नरमध्ये मालिकेच्या नावाखाली ७५ हजारांचा गंडा
जुन्नर – “कौन बनेगा करोडपती’ या मालिकेतील “लकी ड्रॉ’मध्ये आपला नंबर लागला आहे, अशी बतावणी करून जुन्नरमधील एका प्राध्यापकाला 75 हजार रुपयांचा गंडा घातल्याची घटना घडली आहे. याबाबत भगवान मारुती चिमटे (रा. आंबे, ता. जुन्नर) यांनी जुन्नर पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार नोंदवली आहे.
भगवान चिमटे यांना फोनवरून राजेशकुमार नामक व्यक्तीने आपल्याला 25 लाख रुपयांचे बक्षीस लागले आहे, अशी बतावणी केली आणि त्या बक्षीसावरील 75 हजार रुपयांचा कर भरण्यास सांगितले. ही रक्कम चिमटे यांनी ऑनलाइन ट्रान्सफर केली. या भामट्याने पुन्हा अधिक रकमेची मागणी केली.
मात्र चिमटे यांना संशय आल्याने त्यांनी रक्कम परत करण्याची मागणी केली असता त्या व्यक्तीने रक्कम देण्यास नकार दिल्यामुळे चिमटे यांनी तक्रार दाखल केली असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे करत आहेत.