पुणे – उच्च शिक्षण संचालनालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती योजनांसाठी 1 लाख 51 हजार 293 ऑनलाइन अर्ज दाखल झाले आहेत. यातील 75 हजार 559 अर्ज शैक्षणिक संस्थांच्या स्तरावर तर 29 हजार 654 अर्ज विभागीय सहसंचालक स्तरावर पडताळणीसाठी प्रलंबित पडले आहेत. प्रलंबित अर्जांची नियमित पडताळणी करणे आवश्यक आहे. राज्यशासनाच्या शिष्यवृत्ती योजनांची महाडीबीटी पोर्टलवरून ऑनलाइन पद्धतीने अंमलबजावणी करण्यात येत आहे.
विद्यार्थी, महाविद्यालयांच्या मदतीसाठी डीबीटी पोर्टलवर व्हिडीओ, मॅन्युअल उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. महाविद्यालयांनी त्यांच्या डीबीटी पोर्टलवर प्रोफाईल अद्ययावत करणे, महाविद्यालयातील अभ्यासक्रमाच्या शुल्कास संबंधित विभागीय सहसंचालक, शिक्षण शुल्क समितीकडून मंजुरी घेण्यासाठी 15 नोव्हेंबरपर्यंत अंतिम मुदत देण्यात आलेली आहे.
याच मुदतीत विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती अर्ज भरणे गरजेचे आहे. महाविद्यालय, विद्यापीठ, संस्था यांनी त्यांच्या लिपिक व प्राचार्य यांच्या लॉगिनवरून अर्जांची पडताळणी करण्यासाठी 30 नोव्हेंबर तर विभागीय सहसंचालकांनी त्यांच्या लॉगिनवरून अर्जांची पडताळणी करण्यासाठी 5 डिसेंबर अशी मुदतवाढ देण्यात आलेली आहे.
शिक्षण संचालकांनी बजावला आदेश
शिष्यवृत्तीसाठी पात्र विद्यार्थ्यांना मुदतीत अर्ज भरण्याबाबत कळविण्यात यावे. शैक्षणिक संस्था व विभागीय सहसंचालक कार्यालयांनी रोजच्या रोज अर्जांची पडताळणी करणे गरजेचे आहे. शिष्यवृत्ती योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करा. कोणत्याही परिस्थितीत महाविद्यालय, विभाग स्तरावरील लॉगिनवर शिष्यवृत्ती अर्ज पडताळणीसाठी प्रलंबित राहणार नाही याची दक्षता घ्यावी व अहवाल सादर करावेत, असे आदेश उच्च शिक्षण विभागाचे शिक्षण संचालक डॉ. धनराज माने यांनी सर्व विभागीय सहसंचालक, मुंबईचे शिक्षण शुल्क समितीचे सहसंचालक यांना बजाविले आहेत.