सत्तेत आल्यास नोकरीत स्थानिकांना 75 टक्के आरक्षण: अजित पवार

वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्याचा प्रयत्न : आघाडी 175 जागा जिंकणार असल्याचा विश्वास

सोलापूर (प्रतिनिधी) – आघाडीचे सरकार सत्तेत आल्यास स्थानिक तरुणांना नोकरीत 75 टक्के आरक्षण देण्यात येईल. तसेच त्यासाठी कायदा करणार असल्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे विधिमंडळाचे नेते अजित पवार यांनी सांगितले.
माजी उपमुख्यमंत्री अजित पवार शुक्रवारी सोलापूर दौऱ्यावर होते. विधानसभेसाठी राष्ट्रवादीकडून इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या मुलाखती घेतल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी भाजप सरकारच्या कारभारावर ताशेरे ओढले.

अजित पवार म्हणाले, अनेक ठिकाणी नोकरीसाठी जागा रिक्त असताना भरतीच्या बाबतीत जाणीवपूर्वक चालढकल करण्यात येत आहे. आताच नगरपरिषद, नगरपालिका आणि नगरपंचायतीमधील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू केला आहे. पाच वर्षे या सरकारला कोण थांबविले होते. निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन कॅबिनेटमध्ये बरेचसे निर्णय घेण्यात येत आहेत. राज्य सरकारकडून मते मिळविण्यासाठी अशा प्रकारचा केविलवाणा प्रयत्न केला जात आहे. आज शेती आणि पाण्याचे नियोजन बिघडले आहे त्याला सरकार आणि त्या विभागाचे अपयश असल्याचे ते म्हणाले.

महाराष्ट्रात 15 आणि केंद्रात 10 वर्षे आघाडीचे सरकार होते. मात्र जाणीवपूर्वक कोणालासुद्धा सरकारने त्रास दिला नाही. मात्र भाजप सरकार ठरवून विरोधकांना अडचणीत आणण्यासाठी खेळी करत आहे. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील आणि वसंतराव नाईक यांच्या काळात निष्ठेला जेवढे महत्व होते ते अलीकडच्या काळात दुर्दैवाने राहिलेले नाही, ही सत्य परिस्थिती आहे.

गेल्या 30 वर्षाचा अनुभव पाहता आघाडीच्या 175 जागा निवडून आणण्याचा प्रयत्न सुरु आहे. म्हणूनच विधानसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीसोबत घेण्याचा राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसचा प्रयत्न आहे. वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांनी समंजस भूमिका घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

वाद न घालता 288 जागामध्ये सामंजस्य भूमिका घेऊन व त्यांना सोबत घेऊन प्रत्येक पक्षाची त्या-त्या भागातील राजकीय व भौगोलिक परिस्थिती लक्षात घेऊन मार्ग काढण्यात येणार आहे. तसेच समविचारी पक्षांनी एकत्र यावे, असा आमचा प्रयत्न राहणार आहे. लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीमुळे मतविभाजन झाले. अन्यथा सोलापूरचा निकाल वेगळा असता, असेही त्यांनी सांगितले. सांगली, परभणी, बुलढाणा, हातकणंगले आदी ठिकाणीसुद्धा खासदार निवडून आले असते असे ते म्हणाले.

सरकारमध्ये असणाऱ्यांनी मोर्चा काढायचा नसतो

भाजप-सेनेची युती आहे. मात्र सतत एकमेकांना ढुसणी देत आहेत. एकमेकांची उणीधुणी काढत आहेत. जनतेने पाच वर्षे सुरु असलेला कारभार पाहिला आहे. महाराष्ट्राचा कारभार ज्या पद्धतीने चाललेला आहे. एकमेकांच्या विरोधात मोर्चे काढत आहेत. एकीकडे सरकारमध्ये असताना शेतकऱ्यांना पिकविम्याचे पैसे मिळायला पाहिजेत म्हणायचे आणि ते मिळत नाहीत म्हणून मोर्चे काढायचे. सरकारमध्ये असणाऱ्यांनी मोर्चा काढायचा नसतो, अंमलबजावणी करायची असते. धोरण राबवायचे असतता. त्यामुळे सरकारवर दबाव टाकून शेतकऱ्यांचे पैसे देण्यासाठी आदेश सांगितले पाहिजे असेही, अजित पवार म्हणाले.

मुलाखतीला दोन आमदानांची दांडी

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील राष्ट्रवादी पक्षातील इच्छुकांच्या मुलाखती शुक्रवारी सोलापुरातील राष्ट्रवादी भवनात नेते अजित पवार यांच्या उपस्थितीत पार पडल्या. परंतु माढाचे आमदार बबन शिंदे आणि बार्शीचे आमदार व माजी मंत्री दिलीप सोपल यांनी पवारांच्या उपस्थितीत झालेल्या या मुलाखतींना चक्क दांडी मारल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

आमदार शिंदे भाजप, तर सोपल हे शिवसेनेच्या वाटेवर आहेत. काही दिवसांपूर्वी आमदार शिंदे यांनी मुख्यमंत्री फडणवीस सोलापुरात आल्यानंतर तर सोपल यांनी सेनेचे जिल्हा सहसंपर्क प्रमुख लक्ष्मीकांत ठोगे पाटील यांची शासकीय विश्रामगृह येथे भेट घेऊन चर्चा केली होती. या दोघांनीसुद्धा बैठकीला दांडी मारल्याने राष्ट्रवादीचे दोन आमदार अन्य पक्षांच गळाला लागल्याचे बोलले जात आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.