पिंपरी – शहरात आलेल्या पाहुण्यांचे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने भेटवस्तू देऊन स्वागत केले जाते. मागील दोन वर्षांमध्ये शहरात आलेल्या पाहुण्यांच्या भेटवस्तूवर 78 लाख रुपये इतका खर्च करण्यात आला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी बालेवाडी येथे आले होते. पंतप्रधान व त्यांच्या सहकाऱ्यांच्या स्वागतासाठी तत्कालीन महापौर राहुल जाधव यांच्या सूचनेनुसार पाच भक्ती-शक्ती शिल्प घेण्यात आली होती. त्यापूर्वी राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भोसरी येथील अंकुशराव लांडगे नाट्यगृह याठिकाणी आले होते. त्या वेळचे शहराचे महापौर नितीन काळजे यांच्या सूचनेनुसार 2 भक्ती-शक्ती शिल्पे घेण्यात आली होती.
तसेच आंतरराष्ट्रीय टेनिसपटू लिऍडर पेस, रामनाथ रामकुमार, अर्जुन कढे व इतर मान्यवर आले होते. त्यांच्या स्वागतासाठी 5 भक्ती-शक्ती शिल्पे घेण्यात आली होती. मेसर्स आल्हाट आर्ट स्डुडिओ यांच्याकडून एकूण 12 शिल्पे तातडीच्या आवश्यकतेनुसार थेट पद्धतीने खरेदी करण्यात आली होती.
आल्हाट स्टुडिओ यांच्याकडून 2 फुटी भक्ती-शक्ती शिल्पासाठी 7 हजार रुपये अधिक 12 टक्के जीएसटी या दराने 7 शिल्पे खरेदी करण्यात आली. तर 14 इंची भक्ती शक्ती शिल्पाकरिता 14 हजार रुपये अधिक 12 टक्के जीएसटी याप्रमाणे 2 शिल्प घेण्यात आली. आल्हाट स्टुडिओ यांच्याकडून 9 शिल्पे 78 हजार 400 रुपयांना खरेदी केली आहेत. त्यांची बिले त्यांनी सादर केली आहेत.