नेवासातील 75 जि. प. शाळा नवीन इमारतीच्या प्रतीक्षेत

जिल्हा परिषद प्रशासनाचे जाणिवपूर्वक दुर्लक्ष 
तालुक्‍यातील विद्यार्थ्यांचे भवितव्य लागले टांगण

शाळा भरताहेत ग्रामपंचायत कार्यालयात

तालुक्‍यातील जायगुडे वस्ती व हंडीनिमगाव येथील मुले ग्रामपंचायत इमारतीत, कदमवस्तीवरील मुले मंदिरात, मुळा कॉलनी व पाचुंदे येथील शाळा पत्राच्या शेडमध्ये भरत आहेत. त्यामुळे या शाळांकडे पालकांनी पाठ फिरवल्याने शाळांची पटसंख्या खालावली आहे. तालुक्‍यातील 75 शाळांतील विद्यार्थी पर्यायी ठिकाणी किंवा एकाच वर्गात दोन वर्ग बसवणे, शाळेच्या पडवीत वर्ग भरवून ज्ञानदानाचे काम सध्या सुरू आहे.

नेवासा – जिल्हा परिषदेच्या शाळा आजपासून सुरू झाल्या आहेत. शाळेच्या पहिल्याच दिवशी शाळेत गुलाबाची फुले देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. मात्र नेवासा तालुक्‍यातील 75 जि. प. शाळांना नवीन इमारतीची प्रतीक्षा आहे. त्यातील अनेक शाळांतील विद्यार्थी वर्ग नसल्याने पर्यायी जागेवर शिक्षणाचे धडे घेत आहेत. तर अनेक ठिकाणी धोकादायक झालेल्या वर्गात बसून विद्यार्थी शिकत आहेत. या शाळांची पाहणी करून तातडीने नवीन शाळा इमारत देण्याचे आदेश अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. मात्र अद्यापही या कामास सुरुवात झाली नसल्याने शासन मोठ्या दुर्घटनेची वाट पाहते आहे काय, असा संतप्त सवाल पालकांतून उपस्थित होत आहे.

नगर तालुक्‍यातील निंबोडी येथे शाळा इमारत कोसळून तीन विद्यार्थी मृत्युमुखी पडले होते. या घटनेनंतर जिल्हा परिषद शाळांच्या इमारतीचा प्रश्‍न ऐरणीवर आला होता. त्यानंतर जिल्हा परिषदेने सर्व शाळांचे स्ट्रक्‍चरल ऑडिट करण्याचे आदेश दिले होते. परंतु जिल्हा परिषेदेच्या अधिकाऱ्यांनी शाळांना भेटी दिल्या नाहीत किंवा तशी नोंद शाळेच्या शेरा बुकमध्ये केली नाही. वास्तविक पाहता जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीच्या अभियंत्यांनी शाळेला भेटी देऊन प्रत्यक्ष पाहणी करायला हवी होती. परंतु तशी कोणतीही पाहणी किंवा इमारतीचे ऑडिट अधिकाऱ्यांनी केले नाही. त्यामुळे जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्‍न पुन्हा ऐरणीवर आला आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचे चाललेय काय, असा सवाल पालकवर्गातून उपस्थित होत आहे.

नेवासा तालुक्‍यात 253 जिल्हा परिषद शाळा आहेत. त्यापैकी 75 शाळांच्या इमारती मोडकळीस आल्या आहेत. त्यांची पाहणी करून त्यांचे निर्लेखन प्रस्ताव बांधकाम विभागाकडे पाठवले. हे प्रस्ताव जिल्हा परिषेदेला सादर देखील केले आहेत. मात्र या निधी उपलब्ध केला जुन्याच इमारतींत शाळा भरविण्याची वेळ आली आहे. सध्या पावसाळा असल्याने पाऊस पडला की वर्गात पाणी शिरते, शाळेचे छत गळू लागते. भिंतींना भेगा पडल्या आहेत. शाळांच्या भिंती जीर्ण झाल्याने विद्यार्थ्यांच्या जीवला धोका निर्माण झाला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.