नवी दिल्ली : जगामध्ये कोरोनाचे थैमान काही केल्या थांबत असताना दिसत नाही. दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. 212 देशांमध्ये मागील 24 तासांमध्ये 74,228 नवे कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर मृत्यू झालेल्यांच्या संख्येत 3403 ने वाढ झाली आहे.
वल्डोमीटरने दिलेल्या माहितीनुसार, जगभरात आतापर्यंत 42 लाखांहून अधिक लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर यांपैकी 2 लाख 87 हजार 137 लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच 15 लाख 26 हजार 975 लोक कोरोनामुक्त होऊन आपल्या घरी परतले आहेत. जगभरातील जवळपास 73 टक्के कोरोनाचे रुग्ण फक्त दहा देशांमध्ये आहेत. या देशांमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या जवळपास 31 लाखांवर पोहोचली आहे.
जगभरात एकूण रुग्णांपैकी जवळपास एक तृतियांश रुग्ण अमेरिकेमध्ये समोर आले आहेत. तर जवळपास एक तृतियांश मृत्यूही अमेरिकेतच झाले आहेत. अमेरिकेनंतर इंग्लंडमध्ये कोरोनाचा सर्वाधिक कहर पाहायला मिळत आहे. जिथे 32,065 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर इंग्लंडमधील एकूण कोरोना बाधितांचा आकडा 223,060 वर पोहोचला आहे. इंग्लंडमधील कोरोना बाधित रुग्णांची संख्या स्पेनपेक्षा कमी आहे. यानंतर रुस, फ्रांन्स, जर्मनी, टर्की, इराण, चीन, ब्राझील, कॅनडा यांसारख्या देशांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव सर्वाधिक पाहायला मिळत आहे.