5,313 नवीन करोना बाधित
पुणे – पुणे शहरात गेल्या चोवीस तासांत 5 हजार 313 नवीन करोनाबाधित आढळले असून, बरे झालेल्या 4 हजार 573 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर उपचार सुरू असलेल्या 55 पुणेकरांसह 73 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागल्याने चिंतेत भर पडली आहे.
शहरातील ऍक्टिव्ह बाधितांची संख्या 54 हजार 61 झाली असून, 5 हजार 181 जणांना ऑक्सिजनवर ठेवण्यात आले आहे. तर 1 हजार 86 रुग्णांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
शहरातील आतापर्यंतची रुग्णसंख्या 3 लाख 39 हजार 823 झाली आहे. यापैकी 2 लाख 79 हजार 906 रुग्ण बरे झाले असून, एकूण 5 हजार 856 जणांचा मृत्यू झाला आहे. ही साथ सुरू झाल्यापासून आतापर्यंत 17 लाख 65 हजार 346 कोरोना टेस्ट करण्यात आल्या आहेत. यामध्ये मागील चोवीस तासांत करण्यात आलेल्या 21 हजार 166 टेस्टचा समावेश आहे.
दहा रुग्णालयातील लसीकरण केंद्र बंद
बाधितांची संख्या वाढत असल्याने शहरातील शासकीय, महापालिका आणि खासगी रुग्णालयांवरील ताण वाढू लागला आहे. यासाठी मोठ्याप्रमाणावर मनुष्यबळ लागत असल्याने मागील काही दिवसांपासून करोना प्रतिबंधक लसीकरण करणाऱ्या दोन रुग्णालयांसह नव्याने परवानगी मिळालेल्या 8 अशा 10 रुग्णालयांनी लसीकरण करणे शक्य नसल्याने मंगळवारी लसीकरण बंद ठेवल्याची माहिती महापालिकेच्या सहाय्यक आरोग्य प्रमुख डॉ. वैशाली जाधव यांनी दिली.