आळंदी – येथील माऊलींचे राहते घर सिद्धबेट येथे संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या धाकट्या बहिण आदिशक्ती श्री संत मुक्ताई यांचा 725 वा अंतर्धान समाधी सोहळा बुधवारी (दि.25मे) हरिनाम गजरात उत्साहात पार पडला. हभप शिवाजी महाराज पोळ यांनी भाविकांच्या सहकार्यातून या सोहळ्याचे आयोजन केले होते.
सोहळ्यानिमित्त सकाळी भजन करण्यात आले. निर्याणाचे अभंग होऊन बारा वाजताच्या सुमारास संत मुक्ताई यांच्या प्रतिमेवर गुलाल व फुलांचा वर्षाव करण्यात आला. हभप कैलास महाराज ढगे, वैजनाथ महाराज फड यांच्याकडून उपस्थित भाविकांना मांडेभोजनाचे आयोजन करण्यात आले. या अंतर्धान सोहळ्यास हभप शिवाजी महाराज नवल, विठ्ठल महाराज दहिफळे, सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेतील चारही वर्षातील विद्यार्थी आणि परिसरातील कीर्तनकार मंडळी, असे पाचशेहून अधिक भाविक उपस्थित होते.