मुंबई – महाराष्ट्र शासनाने राज्यात सन 2020 ची पोलीस शिपाई संवर्गातील 7231 रिक्त पदे भरण्यास मंजुरी दिली आहे. तसेच शासनाने महाराष्ट्र पोलीस शिपाई सेवाप्रवेश नियमामध्ये सुधारणा केली असून पोलीस भरतीसाठी पहिल्यांदा शारीरिक चाचणी होणार आहे. मैदानी चाचणीतील उत्तीर्ण उमेदवारांचीच लेखी परीक्षा घेतली जाणार आहे.
पोलीस शिपाई पदासाठी एकूण 50 गुणांची शारीरिक चाचणी होणार आहे. शारीरिक चाचणीमध्ये किमान 50 टक्के गुण मिळविणारे उमेदवार, संबंधित प्रवर्गामधील जाहिरात दिलेल्या रिक्त पदांच्या 1:10 या प्रमाणात 100 गुणांच्या लेखी चाचणीसाठी पात्र असतील, लेखी चाचणीमध्ये अंकगणित, सामान्य ज्ञान व चालू घडामोडी, बुद्धिमत्ता चाचणी मराठी व्याकरण या विषयावर आधारीत प्रश्न असतील.
उमेदवारांना लेखी परीक्षेमध्ये किमान 40 टक्के गुण मिळवणे अनिवार्य आहे. लेखी परीक्षेमध्ये 40 टक्के पेक्षा कमी गुण असलेले उमेदवार अपात्र समजण्यात येतील. सदरहू पोलीस भरतीमधील लेखी परिक्षा विशेष बाब म्हणून घेण्याबाबत शासनाने मान्यता दिली आहे.
या नव्या दुरुस्तीचा लाभ पोलिस दलास होणार असून, त्यांना ताकदवान मनुष्यबळ उपलब्ध होईल. तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना या बदलाचा मोठा फायदा होईल, असा विश्वास गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केला आहे.