विनाथांबा कोकिळीचा 7,200 किमीचा प्रवास!

-गायत्री वाजपेयी -जिओ टॅगिंगच्या माध्यमातून उलगडताहेत स्थलांतरित पक्ष्यांची गुपिते

पुणे  -पक्षी विनाथांबा किती प्रवास करू शकत असेल? विचार करून थक्क व्हाल… आपली साधी कोकिळा तब्बल सात दिवस न थांबता 7,200 किमी प्रवास करून गेली. अख्खा अरबी समुद्र तिने न थांबता पार केला. ही आणि अशी अनेक गुपिते आता उलगडणार आहेत. निमित्त झालेय ते जगभरातील विविध संस्थांतर्फे जिओ टॅगिंगच्या माध्यमातून पक्ष्यांच्या प्रवास मार्गांच्या अभ्यासाचे.

जगाच्या विविध भागांमधून भारतात येणारे तसेच भारतातून स्थलांतरित होत जगाच्या विविध भागांमध्ये प्रवास करणाऱ्या या पक्ष्यांच्या प्रवास मार्गाची गुपिते यातून लवकरच उलगडणार आहे. जगातील एका ठिकाणाहून दूरवरील दुसऱ्या ठिकाणी प्रवास करणाऱ्या स्थलांतरित पक्ष्यांची संख्या प्रचंड आहे. मात्र, महासागर आणि अनेक देश ओलांडणाऱ्या पक्ष्यांच्या प्रवास मार्गाबाबत आजपर्यंत संशोधकांकडे सखोल माहिती उपलब्ध नव्हती.

त्यामुळेच जगभरातील अनेक संस्थांच्या माध्यमातून याचा अभ्यास केला जात आहे. यासाठी पक्ष्यांचे जिओ टॅगिंग केले जात आहे. भारतातही वाइल्ड लाइफ इन्स्टिट्यृट ऑफ इंडिया, बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी या संस्था या उपक्रमात सहभागी आहेत.

जिओ टॅगिंग केलेल्या तीन पक्ष्यांच्या प्रवासमार्गांची नोंद नुकतीच करण्यात आली आहे. यामध्ये गुजरातमध्ये सारसने गुजरात ते कझाकिस्तान, मध्य प्रदेशातून कोकीळ सोमालिया ते भारत आणि घार उत्तर आणि मध्य आशियातील तब्बल 19 देशांमधून प्रवास केला असल्याचे समोर आले आहे.

संशोधकांच्या मांडणीनुसार, या पक्ष्यांनी सात दिवस ते दोन महिन्यांच्या कालावधीत हजारो किलोमीटरचा प्रवास केला. कोकीळ विनाथांबा अरबी समुद्र पार करत केवळ सात दिवसांत सोमालिया ते भारत असा 7200 किमी अंतर पार केले.

अभ्यासाचे फायदे…
जिओ टॅगिंग अभ्यासाद्वारे मिळणाऱ्या माहितीमुळे पक्ष्यांच्या स्थलांतर मार्गांची निश्‍चिती करण्यास मदत मिळणार आहे. या माध्यमातून त्यांच्या अधिवासाचे ठिकाण आणि त्यांचे संवर्धन करण्यासाठी पुढील दिशा ठरविता येणार आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.