शिरूर -केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने पुणे – शिरुर या 67 कि. मी. लांबीच्या रस्त्यावरील प्रस्तावित दुमजली पुलाच्या एलिव्हेटेड कॉरिडॉरसाठी 7 हजार 200 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे., अशी माहिती खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी दिली.
गेल्या काही महिन्यांपासून पुणे – शिरुर रस्त्याच्या कामासाठी त्यांनी अनेक बैठका घेतल्या होत्या. विविध पर्यायांचा विचार विचार करण्यात येत होता. भूसंपादन करण्यात येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन दुमजली पुलांसह 18 पदरी रस्ते करण्याचा पर्याय निवडण्यात आला.
त्यानंतर केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या सूचनेनुसार राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत या प्रकल्पाचे सादरीकरण पार पडले. खासदार डॉ. कोल्हे व आमदार ऍड. अशोक पवार यांच्याशी सल्लामसलत करून उपमुख्यमंत्री पवार यांनी
अखेरीस दुमजली पुलांसह 18 पदरी रस्ते करण्याच्या पर्यायावर शिक्कामोर्तब केले होते. त्यानंतर या रस्त्याच्या प्रस्तावाच्या कामाला गती मिळाली होती.
खासदार डॉ. अमोल कोल्हे म्हणाले की, एखादा शब्द आपण मतदारांना दिल्यानंतर त्याची पूर्तता होते त्याचा आनंद वेगळाच असतो. पुणे – शिरूर रस्त्याची वाहतूक कोंडी हा खूपच जटील प्रश्न होता. रांजणगाव इंडस्ट्रियल असोसिएशनच्या प्रत्येक बैठकीत हा प्रश्न मांडला जात होता.
शिक्रापूर, वाघोलीसह विविध ठिकाणची वाहतूक कोंडी हा चिंतेचा विषय बनला होता. त्यामुळे या रस्त्याच्या कामासाठी अनेक बैठका घेतल्या. विविध पर्यायांवर चर्चा करण्यात आली. त्यातूनच दुमजली पुलांसह 18 पदरी रस्ते करण्यास मंजुरी मिळाली.
डीपीआरसाठी 20 कोटी मंजूर
पुणे-शिरूर रस्त्याचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) बनविण्यासाठी 20 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे. बुधवारी (दि. 28) सल्लागार (कन्सल्टंट) नेमणूक करण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू होणार आहे.