नेवाशातील 72 शाळा विद्यार्थ्यांसाठी सज्ज

गणेश घाडगे 

नेवासे  -देशासह राज्यात करोनाचे रुग्ण वाढल्याने शासनाने लॉकडाऊन घोषित केला होता. आता टप्प्याटप्प्याने अनलॉकची प्रक्रिया सुरू आहे. राज्य सरकारने 23 नोव्हेंबर रोजी नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला असून, तालुक्‍यातील 72 शाळा विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी सज्ज झाल्या आहेत.

करोनाचा प्रादुर्भाव देशात वाढू लागल्याने केंद्र सरकारने लॉकडाऊन केले होते. त्यामुळे मागील आठ महिन्यांपासून शाळा बंद आहेत. आता राज्य सरकारने 23 नोव्हेंबरपासून शाळा टप्प्याटप्प्याने सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी तालुकास्तरावर आदेश देत शासनाच्या ठरवून दिलेल्या नियमांनुसार सोमवारपासून नववी, दहावी, अकरावी व बारावीचे वर्ग सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. नेवासे तालुक्‍यात 72 शाळा विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी सज्ज झाल्या आहेत. या शाळांनी पालकांची बैठक आयोजित करून त्यांची भूमिका समजावून घेतली. तसेच त्यांच्याकडून संमतिपत्र भरून घेतले. त्यामुळे सोमवारीच किती विद्यार्थी शाळेत येतात, हे समजणार आहे.

तालुक्‍यातील या 72 शाळांनी वर्गांत फवारणी करत शाळांची रंगरंगोटी करून स्वच्छता केली आहे. तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या लेखी आदेशामध्ये शाळेत हात धुण्यासाठी सुविधा उपलब्ध करणे, वाहतूक सुविधांचे निर्जुंतुकीकरण करणे, एखाद्या शाळेत क्वारन्टाइन सेंटर असल्यास स्थानिक प्रशासनाने ते इतर ठिकाणी सुरू करावे.

तसे शक्‍य नसल्यास शाळा इतर ठिकाणी किंवा खुल्या परिसरात भरवावी, वर्ग खोली व स्टाफरूममधील बैठक व्यवस्था शारीरिक अंतरच्या नियमांनुसार असावी, शाळेत दर्शनी भागात मार्गदर्शक सूचनांचा फलक लावावा, शिक्षक-पालकांच्या बैठका ऑनलाइन घ्याव्यात, यासह विविध सूचना केल्या असल्याची माहिती गटशिक्षण अधिकारी सुलोचना पटारे यांनी दिली.

आम्ही पालकांना निरोप देवून संमतिपत्रक भरून मुलांना शाळेत पाठवा, असे आवाहन केले आहे. शाळेत फवारणी करण्यात आली असून, दररोज शाळेची स्वछता केली जाणार आहे. एका बाकावर एकच विद्यार्थी, तसेच शाळेच्या प्रवेशद्वारावर सनिटायझर ठेवून तेथेच विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात येणार आहे. शासनाचे सर्व नियम पाळूनच वर्ग सुरू करण्यात येणार आहेत.
मनीषा राऊत-घाडगे
मुख्याध्यापिका, घाडगे पाटील विद्यालय

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.