आंबेगाव-शिरूरमध्ये ७१ टक्‍के मतदान

मंचर – आंबेगाव विधानसभा मतदारसंघात सोमवारी (दि. 21) सहा वाजेपर्यंत सरासरी 71 टक्के मतदान झाले, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र डूडी यांनी दिली. सकाळपासून मतदानाला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.

सकाळी सात वाजता मतदानास प्रारंभ झाला. सकाळी मतदारांनी मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी गर्दी केली होती. सकाळी सात ते नऊ वाजेपर्यंत 6.7 टक्के मतदान झाले. त्यानंतर अकरा वाजेपर्यंत 20.9 टक्के, एक वाजेपर्यंत 37.64 टक्के तर 3 वाजेपर्यंत 52.14 मतदान झाल्याची माहिती सहायक निवडणुक निर्णय अधिकारी रमा जोशी यांनी दिली.

मतदान करून घेण्यासाठी कार्यकर्ते आग्रही होते. घरापासून तर मतदान केंद्रापर्यंत मतदारांना ने आण करण्यासाठी वाहनांची व्यवस्था करण्यात आली होती. ज्येष्ठ नागरिकांना हाताला धरुन मतदान केंद्रापर्यत कार्यकर्ते नेत होते. मतदान केल्यानंतर मतदान केंद्राबाहेर मतदारांसाठी नाष्ट्याची व्यवस्था करण्यात आली होती. काही ठिकाणी विविध पक्षाच्या कार्यकर्त्यांना समूहाने मतदान केंद्रात येण्यासाठी पोलीस मज्जाव करत होते.

मतदान केंद्रापासून 200 मीटर लांब अंतरावर कार्यकर्त्यांनी थांबावे. समूहाने थांबू नये, असे आवाहन मंचर पोलीस ठाण्याचे निरीक्षक कृष्णदेव खराडे हे करत होते. मंचर पोलीस ठाण्याच्या वतीने 4 पोलीस निरीक्षक, 3 पोलीस उपनिरीक्षक, 74 पोलीस कर्मचारी, एसआरपीएफचे 18 जवान, 19 वनरक्षक, 76 होमगार्ड, पीआयएफएस कंपनीचे 32 सशस्त्र जवान बंदोबस्तासाठी होते. सर्वत्र शांततेत मतदान प्रक्रिया झाली. क्षेत्रीय अधिकारी यांची सतत फिरती सुरू होती.

Leave A Reply

Your email address will not be published.