पश्‍चिम बंगालमध्ये ७०० डॉक्‍टरांचा राजीनामा

कोलकता – पश्‍चिम बंगालमध्ये संप पुकारणाऱ्या डॉक्‍टरांनी आणखीच आक्रमक पवित्रा स्वीकारला आहे. राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी माफी मागावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. दरम्यान, आंदोलनाला पाठिंबा दर्शवत सरकारी रूग्णालयांमधील ७०० हून अधिक डॉक्‍टरांनी राजीनामा दिला आहे. तसेच मागण्या मान्य करण्यासाठी ४८ तासांचा सरकारला अल्टिमेटम देण्यात आला आहे.

येथील एनआरएस वैद्यकीय महाविद्यालयाच्या रूग्णालयात सोमवारी रात्री एका रूग्णाचे निधन झाले. त्या रूग्णाच्या कुटूंबीयांनी केलेल्या हल्ल्यात दोन डॉक्‍टर जखमी झाले. त्या घटनेचा निषेध करण्यासाठी पश्‍चिम बंगालमधील डॉक्‍टरांनी आंदोलन छेडले आहे. त्या आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर ममतांनी गुरूवारी एसएसकेएम रूग्णालयाला भेट देऊन डॉक्‍टरांपुढे भूमिका मांडली. गोंधळ निर्माण करण्यासाठी बाहेरील लोक वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये घुसले आहेत. डॉक्‍टरांचे आंदोलन म्हणजे माकप आणि भाजपचे कारस्थान आहे, असे त्या म्हणाल्या. मात्र, संपकरी डॉक्‍टरांना ती भूमिका न रूचल्याने त्यांनी ममतांनी बिनशर्त माफी मागावी, अशी मागणी केली आहे. संप मागे घेण्यासाठी त्यांनी राज्य सरकारपुढे सहा अटीही ठेवल्या. ममतांनी जखमी डॉक्‍टरांची भेट घ्यावी, डॉक्‍टरांवरील हल्ल्याचा मुख्यमंत्री कार्यालयाने निषेध करावा, डॉक्‍टरांना सुरक्षा पुरवावी आदींचा त्यात समावेश आहे. अत्यावश्यक सेवा सोडून बाकी सर्व सेवा बंद ठेवण्यात आल्या आहेत.

दरम्यान, इंडियन मेडिकल एसोसिएशनच्या मंडळाने केंद्रीय आरोग्यमंत्री  डॉक्‍टर  हर्षवर्धन यांची भेट घेतली असून आपल्या समस्या त्यांच्यासमोर मांडल्या आहेत. याशिवाय १७ जून रोजी डॉक्टरांनी देशव्यापी आंदोलनाचे आवाहन केले आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)