70 वर्षांपूर्वी प्रभात…गुरुवार ता. 6 माहे ऑगस्ट सन 1953

नियोजित कापड गिरणी कामगार संप बेकायदा ठरविला!

मुंबई, ता. 5 : कापड गिरणी कामगारांचा नियोजित संप मुंबई सरकारने बेकायदा ठरविला आहे; आणि बहकावणीस बळीं न पडण्याचा सल्ला कामगारांना दिला आहे. संप करण्यापूर्वी दोनदा विचार करण्याचा उपदेशही केला आहे.

मुंबई सरकारच्या सचिवालयांत आज मजूरमंत्री श्री. शांतिलाल शहा यांनी पत्रकारांना सरकारचा हा निर्णय निवेदन केला. रॅशनलायझेशनच्या मालकशाहीच्या आक्रमणाचा निषेध आणि खटाव मिलच्या अन्नसत्याग्रह करणाऱ्या कामगारांना सहानुभूति दाखविण्यासाठीं हा संप मिल मजदूर सभेच्या (लाल झेंडा) आदेशानें होणार आहे.

संपाचे परिणाम

श्री. शांतिलाल म्हणाले – असा संप म्हणजे बेकायदा काम थांबविणे असून संपही बेकायदाच होईल. त्यामुळे कामगारांची रजा जाईल आणि इतरही तोटे होतील.

कम्युनिस्टांवर आरोप

कम्युनिस्ट आपले गेलेले वजन बसविणेचे दृष्टीनें संपांची चिथावणी देत आहेत असा आरोप करून श्री. शहा म्हणाले-कामगार युनियन मुंबईचे उत्पादनांत व्यत्यय आणीत आहे. या संपाने कामगार 7 लक्ष रुपये वेतन गमावतील.


राणीच्या राज्यारोहण समारंभात हिंदी आरमाराचा भाग

नवी दिल्ली, ता. 5: लोकसभेच्या कामकाजाला आज सकाळी सुरुवात झाल्यानंतर झालेल्या प्रश्‍नोत्तरात उपसंरक्षणमंत्री श्री. महावीर त्यागी यांनीं दुसऱ्या एलिझाबेथ राणीच्या राज्यरोहण समारंभाच्या प्रसंगी राष्ट्रकुल नौदलाच्या प्रात्यक्षिकांत भाग घेतलेल्या हिंदी नौदलासंबंधी माहिती दिली.

ते म्हणाले, “”राज्यारोहण समारंभ प्रसंगी झालेल्या राष्ट्रकुल राष्ट्रांच्या नौदलाच्या लष्करी प्रात्यक्षिकांत हिंदी आरमाराच्या तिघां नौकांनी भाग घेतला होता. त्यासाठीं सुमारे 2 लाख रुपये खर्च आला. या समारंभांत भाग घेण्यासाठी या नौका ब्रिटनमध्ये गेल्या नसत्या व त्यांनीं वार्षिक लष्करी प्रात्यक्षिकांत भाग घेतला असता तरी तेवढाच खर्च आला असता. अर्थातच त्यासाठी जादा काहीं खर्च आलेला नाहीं हा खर्च अर्थातच हिंदुस्थान सरकारनें केलेला आहे.”

प्रा. हिरेन्‌ मुखर्जी यांच्या प्रश्‍नाला उत्तर देतांना श्री. महावीर त्यागी म्हणाले, “”हिंदी आरमाराला शिक्षण देण्यासाठीं ब्रिटिश आरमाराकडून तीन नौका कर्जाऊ घेतल्या आहेत. त्या तीन वर्षांनी ब्रिटिश आरमाराला परत करावयाच्या आहेत.”

 

Leave A Reply

Your email address will not be published.