70 वर्षांपूर्वी प्रभात: शुक्रवार ता. 7 माहे ऑगस्ट सन 1953

परतंत्र देशांच्या स्वातंत्र्य लढ्याला भारताचा पाठिंबा

नवी दिल्ली, ता. 6 : “”इजिप्तला सार्वभौम राष्ट्राचे हक्‍क प्राप्त होतील, अशी हिंदुस्थान सरकारला आशा आहे. साऱ्याच परतंत्र देशांच्या स्वातंत्र्यासाठी भारत सरकारचा पाठिंबा आहे, ही गोष्ट जगजाहीर आहे; परंतु इजिप्तच्या स्वातंत्र्य लढ्याला भारताने सक्रीय हातभार लावण्याचा प्रश्‍न उद्‌भवत नाही,” असे उत्तर पंतप्रधान व परराष्ट्रमंत्री पं. जवाहरलाल नेहरू यांनी प्रा. हिरेन मुखर्जी यांच्या एका प्रश्‍नाला दिले.

भारतीय लोकसभेच्या आजच्या कामकाजाच्या सुरुवातीला प्रश्‍नोंत्तरे सुरू झाल्यावर प्रा. मुखर्जी यांनी सुवेझ कालवा भागांतील ब्रिटिश लष्कराची हकालपट्टी करण्यासाठी ज. नगीब यांनी मदत मागितली होती काय व तसें असल्यास भारत सरकारनें काय उत्तर दिलें, असा प्रश्‍न विचारला होता.

कैरोच्या चर्चेत काय घडले?

कैरो येथे झालेल्या नेहरू-नगीब यांच्या चर्चेचा गोषवारा सांगताना पंडित नेहरू म्हणाले, “”इजिप्शीयन पुढाऱ्याबरोबर चर्चा केली. हिंदुस्थान व इजिप्त यांना समान असलेल्या अनेक आंतरराष्ट्रीय प्रश्‍नांवर आम्ही चर्चा केली.”


अ-णु-बॉं-ब; 14 चौरस मैल उध्वस्त

पर्थ (ऑस्टेलिया), ता. 6 :गेल्या ऑक्‍टोबरमध्यें पश्‍चिम ऑस्ट्रेलियाच्या किनाऱ्याजवळील मॉन्टेबेलो बेटावर ब्रिटनच्या पहिल्या अणुबॉंब स्फोटाची चाचणी झाली. त्यांत सुमारे 14 चौरस मैल संपूर्णपणे उध्वस्त झाला, असे आज जाहीर करण्यांत आले.

ह्या भागास भेट देण्यास अगर त्याची पाहणी करण्यास बंदी करण्यांत आली होती. आज प्रथमच त्या भागावरून पत्रकार असलेले विमान फिरविण्यांत आले. सुमारे दोन-तीन मैलांचा भाग आमच्या नजरेंत आला असें पत्रकारांनी सांगितलें.

रशियाजवळील अणुबॉंबचा अमेरिकेस धोका

वॉशिंग्टन, सोव्हिएत रशिया आपला अणुबॉंबचा साठा वाढवित आहें असें अमेरिकेच्या परराष्ट्र-संबंध समितीचे अध्यक्ष सिनेटर अलेक्‍झांडर बिले यांनी सांगितले.

रशियाजवळील अणुबॉंब हा अमेरिकेपुढील अत्यंत महत्त्वाचा प्रश्‍न आहे असें सांगून अमेरिकेचे सध्याचे परराष्ट्रीय धोरणच योग्य आहे, असेही ते म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.