नवी दिल्ली – जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतर आता काश्मीर खोऱ्यातील सुमारे 70 दहशतवादी आणि फुटीरतावाद्यांना आग्रा येथे हलवण्यात आल्याची माहिती एका वृत्तसंस्थेने दिली आहे. सूत्रांनी दिलेल्या वृत्तानुसार हवाईदलाच्या विशेष विमानाने या दहशतवाद्यांचे स्थलांतर करण्यात आले. या 70 कैद्यांमध्ये बहुतांश दहशतवादी किंवा पाकिस्तान समर्थक फुटीरतावादी आहेत. हे सर्वजण काश्मीर खोऱ्यातील विविध दहशतवादी आणि गैरकृत्यांमध्ये सक्रिय असल्यामुळे त्यांना कारागृहात बंद करण्यात आले होते.
गुरुवारी दुपारी काश्मीर येथून विशेष विमान कैद्यांना घेऊन आग्रा येथील खेरिया विमानतळावर पोहोचले. विमानतळ ते आग्रा कारागृहापर्यंत कडक सुरक्षा तैनात करण्यात आली होती. संपूर्ण मार्गावर पोलिस पथक तैनात होते. केंद्रीय कारागृहाच्या कडक सुरक्षेव्यवस्थेत या कैद्यांना ठेवण्यात येणार आहेत. पोलिस प्रशासनाबरोबर गुप्तचर यंत्रणाही अलर्ट आहेत. काश्मीरमधून कैद्यांना उत्तर प्रदेशशिवाय देशातील इतर अन्य मोठ्या कारागृहात पाठवले जाणार आहे.