प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 7 -पीएमपीएल ताफ्यातील 70 मिडी बसेस इंजिन दुरुस्तीअभावी सात महिन्यांपासून वापराविना डेपोतच उभ्या आहेत. स्पेअर पार्टस मिळत नसल्याने ही परिस्थिती ओढावली आहे. त्यामुळे या बसेसना आता सीएनजी किंवा इलेक्ट्रिक किट बसवले जाणार आहे.
शहरातील अरुंद रस्ते आणि गर्दीच्या मार्गावर मोठ्या बसेस धावतात. त्यामुळे वाहतूक कोंडी होते. त्यावर उपाय म्हणून पीएमपीने टप्प्याटप्प्याने 233 मिडी बसेस खरेदी केल्या. यामध्ये सर्वाधिक टाटा कंपनीच्या बसेस आहेत. सध्या यातील 70 बसेस बंद आहेत. या बसेसमध्ये तांत्रिक बदल करण्याबाबत याबाबत काही संस्थांशी चर्चा करण्यात आली आहे. सुरुवातीला काही बसेस कन्व्हर्ट करण्यासाठी त्यांनी सकारात्मकता दर्शविली आहे. या बसेसची चाचणी झाल्यानंतर उर्वरित बदल केले जातील.
बंद असलेल्या मिडी बसेस सीएनजी आणि इलेक्ट्रिकमध्ये कन्व्हर्ट करण्यात येणार आहेत. यासाठी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. सुरुवातीला काही बसेस कन्व्हर्ट करून त्याची चाचणी झाल्यानंतर उर्वरित बसेसबाबत निर्णय घेऊ.
– लक्ष्मीनारायण मिश्रा, अध्यक्ष, पीएमपी