देहूरोड (वार्ताहर) – करोनाच्या पार्श्वभूमीवर देहूरोड कॅंटोन्मेंट बोर्ड परिसरातील नागरी सुविधा, विलगीकरण कक्ष, औषधे, साहित्य, क्वारंटाइन नागरिकांचे भोजन,अन्नधान्य किट अशा सुविधांसाठी राज्य शासनाच्या वतीने सुमारे 70 लाखांचा निधी देहूरोड कॅंटोन्मेंट बोर्डाला प्राप्त झाला आहे.
कोविड-19 विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी राज्य शासनाच्या वतीने जोरदार प्रयत्न करण्यात येत आहे. देहूरोड परिसरामध्ये दोन करोना बाधित दोन रुग्ण आढळून आले. स्थानिक लोकप्रतिनिधींनी विविध उपाय योजनांसाठी प्रथम 18 लाख रुपये, तर मावळ तालुक्याच्या आरोग्य विभागासाठी 50 लाख रुपयांचा निधी मंजूर करीत त्यातील तीन ते चार लाख रुपयांचे औषध साहित्य देहूरोड कॅंटोन्मेंट बोर्डाला यापूर्वीही देण्यात आले. नुकतेच राज्य शासनाच्या माध्यमातून 50 लाख रुपयांचा निधी बोर्डाला प्राप्त झाला आहे. या वेळी कॅंटोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रामस्वरूप हरितवाल, कॉंग्रेसचे शहराध्यक्ष, नगरसेवक हाजीमलंग मारीमुत्तू, गोपाळराव तंतरपाळे, ऍड. अरुणा पिंजण, महाविकास आघाडीतील राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष ऍड. कृष्णा दाभोळे, कॅंटोन्मेंट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष ऍड. प्रवीण झेंडे, शिवसेनेचे भरत नायडू परशुराम दोडमणी आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
पाच कोटींच्या निधीला मंजुरी
महाराष्ट्र राज्य शासनाकडून सिद्धिविनायक नगरी, दत्तनगर परिसरातील पाणी योजनेसाठी मंजुरीत पाच कोटी निधीला स्थगिती देण्यात आली होती. अत्यावश्यक असलेले पाण्याची सुविधा पाहता महाआघाडी सरकारकडून स्थगित निधी पुन्हा मंजूर करण्यात आले. त्याबाबत ठेकेदाराला काम सुरू करण्याचे आदेश देण्यात आल्याचे महाआघाडीकडून सांगण्यात आले. देहूरोड डिफेन्स थिएटरपासून चिंचोली, झेंडेमळा, समर्थनगर हगवणे, काळोखे मळा, लक्ष्मीनगर भागातील भूमिगत जलवाहिनी जुन्या झाल्याने परिसरातील नागरिकांना कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे याची पाहणी करण्यात आली आणि त्या ठिकाणी नवीन पाईपलाईन टाकण्यासाठी वाढीव निधी मंजूर करण्याचे आश्वासन देत दत्तनगर परिसरातील नादुरुस्त ड्रेनेजलाइन दुरूस्तीचे आदेश देण्यात आले.