7 वर्षे न्यायासाठी संघर्षाचा वेदनादायी प्रवास…

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा शोध घेण्यात सीबीआयला यश नाही

पुणे – अंधश्रद्धा निर्मूलनासाठी अविरतपणे झटणारे आणि समाजात पुरोगामी विचारसरणीला चालना देण्यासाठी कार्यरत असणारे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला आज (दि.20) सात वर्षे पूर्ण होत आहेत. मात्र, सात वर्षे उलटूनही डॉ. दाभोलकरांच्या मारेकऱ्यांचा शोध घेण्यात सीबीआय या प्रतिष्ठित तपास यंत्रणेला अद्यापही यश आलेले नाही. ही अत्यंत वेदनादायी बाब आहे. मात्र, आजही त्यांचे विचार आणि त्यांना न्याय मिळण्याची आशा जिवंत आहे, अशी भावना मुक्‍ता आणि डॉ. हमीद दाभोलकर यांनी व्यक्‍त केली.

डॉ. दाभोलकर यांची पुण्यातील बालगंधर्व पूल येथे दि. 20 ऑगस्ट 2013 मध्ये हत्या करण्यात आली. या हत्येनंतरचे पहिले नऊ महिने महाराष्ट्र पोलिसांनी तपासात अक्षम्य हेळसांड केली. त्यानंतर उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सीबीआयकडे तपास सोपविण्यात आला. या हत्येतील संशयित आरोपी म्हणून सीबीआयने 2016 मध्ये डॉ. विरेंद्र तावडे, ऑगस्ट 2018 मध्ये शरद कळसकर आणि सचिन अंदुरे यांना तर 2019 मध्ये ऍड. संजीव पुनाळेकर व विक्रम भावे यांना अटक करून त्यांच्यावर आरोपपत्र दाखल केले आहे. अमोल काळे, अमित डिगवेकर, राजेश बंगेरा या संशयित आरोपींविरूद्ध अद्यापही आरोपपत्र दाखल करण्यात आलेले नाही. असे असले तरी अद्यापही या हत्येमागील सूत्रधार कोण? हे स्पष्ट झालेले नाही.

हे प्रकरण इथेच थांबले नाही. डॉ. दाभोलकर यांच्या हत्येनंतर कॉम्रेड गोविंद पानसरे, प्राध्यापक कलीबुर्गी, संपादिका गौरी लंकेश या पुरोगामी विचारवंतांचीही हत्या करण्यात आली. या चारही घटनांचे धागेदोरे एकमेकांत गुंतले असल्याचे विविध तपास यंत्रणांच्या तपासातून समोर आले आहे. त्यामुळेच या प्रकरणातील आरोपींवर अनलॉफूल ऍक्‍टिव्हिटीज प्रिव्हेंशन ऍक्‍ट 1967 हा कायदा लावण्यात आला आहे. डॉ. दाभोलकर आणि कॉ. पानसरे यांच्या कुटुंबीयांनी उच्च न्यायालयात केलेल्या याचिकेनंतर सीबीआय आणि महाराष्ट्र पोलीस यांचे विशेष तपास पथक या तपासासाठी नेमण्यात आले आहे.

तपास यंत्रणेला न्यायालयानेही फटकारले…
लॉकडाऊनपूर्वी प्रत्येक महिन्याला एका सीलबंद अहवालाद्वारे तपासाबाबतची माहिती उच्च न्यालयाकडे सादर करण्यात येते. उच्च न्यायालयाने वेळोवेळी या तपासावरून यंत्रणांना फटकारले देखील आहे. न्यायालयाच्या देखरेखीत या तपासाला अधिक बळकटी मिळेल. डॉ. दाभोलकरांच्या मारेकऱ्यांना नक्कीच शिक्षा होईल, हा आशावाद आजही या चळवळीतील प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनात कायम आहे.

कार्यकर्त्यांकडून अखंडपणे कार्य सुरू…
डॉ. दाभोलकर यांनी सुरू केलेले काम आजही जोमाने सुरू आहे. अनेक समविचारी नागरिक हे काम निष्ठेने पुढे नेत आहे. रिंगण नाट्य, मानस मैत्री, जटा निर्मूलन, जादूटोणा विरोधी कायद्याच्या अंमलबजावणीचा पाठपुरावा, जातपंचायतीच्या मनमानीविरोधात आंदोलने, अशा विविध माध्यमातून आम्ही डॉ. दाभोलकरांच्या विचारांचा आदर्श समाजासमोर मांडत आहोत, अशा भावना अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.