नवी दिल्ली – लष्करी जवानांना घेऊन जाणारी एक बस नदीत कोसळल्याने झालेल्या दुर्घटनेत किमान सात लष्करी जवान मरण पावले असून अनेक जण जखमी झाले आहेत. ही घटना आज लडाख प्रदेशातील थोईस गावापासून 25 किमी अंतरावर घडली आहे.
या बस मध्ये एकूण 26 जवान होते. हा भाग लडाखच्या तुर्तुक सेक्टर मध्ये येतो. तेथे त्यांची बस थ्योक नदीत कोसळली. मुख्य रस्त्यापासून 80 ते 90 फुट खोलीवर जाऊन ही बस पडल्याने बसमधील बहुतेक सर्वच जवान जखमी झाले आहेत.
त्यापैकी अनेक जण गंभीर आहेत. जखमी जवानांना परतापुर येथील लष्करी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. लष्कराकडून या प्रकरणाची अधिक माहिती अजून देण्यात आलेली नाही. पण या जवानांना ट्रान्झिट कॅम्पहून सब सेक्टर हनिफ येथे नेले जात असताना वाटेत हा प्रकार घडला.
गंभीर जखमी जवानांना लष्कराच्या पश्चिम विभाग रूग्णालयात दाखल करण्यासाठी हवाईदलाला हेलिकॉप्टर पाठवण्याची विनंती करण्यात आली आहे.