पुणे – राज्यात आणखी सात जणांना “ओमायक्रॉन’ विषाणूची बाधा झाल्याचे शुक्रवारी निष्पन्न झाले असून, त्यातील चार जण पिंपरी चिंचवड मधील आहेत. यांचा समावेश करून राज्यातील ओमायक्रॉन बाधितांची संख्या आता 17 झाली आहे.
राष्ट्रीय विषाणु विज्ञान संस्थेने दिलेल्या ताज्या अहवालानुसार राज्यात ओमायक्रॉन संसर्गाचे आणखी 7 रुग्ण आढळले आहेत. यातील 3 रुग्ण मुंबईचे तर 4 रुग्ण पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रातील आहेत.
आज मुंबईत आढळलेले 3 रुग्ण हे 48, 25 आणि 37 वर्षांचे पुरुष असून, त्यांनी अनुक्रमे टांझानिया, इंग्लंड आणि द. आफ्रिकेतील नैरोबी या देशांमधून प्रवास केला आहे. पिंपरी चिंचवडमध्ये आढळलेले 4 ही रुग्ण हे या आधी नायजेरियावरुन आलेल्या ओमायक्रॉन बाधित आढळलेल्या महिलेचे येथेच राहणारे नातेवाईक आहेत.
या 7 रुग्णांपैकी 4 जणांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. एका रुग्णाने लसीचा एकच डोस घेतला आहे तर एका रुग्णाचे वय साडेतीन वर्षे असल्याने त्याचे लसीकरण झाले नाही. 4 रुग्ण लक्षणेविरहित आहेत तर 3 रुग्ण सौम्य स्वरूपाचे आहेत.
या शिवाय राज्यात 1 नोव्हेंबर पासून आलेल्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांचे देखील क्षेत्रीय पातळीवर सर्वेक्षण सुरू आहे. विमानतळ आणि क्षेत्रीय सर्वेक्षणातून आतापर्यंत 89 प्रयोगशाळा नमुने जनुकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. यापैकी 47 नमुन्यांचा अहवाल अद्याप प्रलंबित आहे.