पणजी -करोनामुक्त ठरलेल्या गोव्यात 7 बाधित आढळले आहेत. ते सर्व बाधित नुकतेच मुंबई आणि गुजरातमधून गोव्यात दाखल झाले होते.
गोव्यात उपचार घेणारा एकही करोनाबाधित नव्हता. त्यामुळे चालू महिन्याच्या प्रारंभी केंद्र सरकारने गोव्याला ग्रीन झोन म्हणून जाहीर केले. मात्र, नवे बाधित आढळल्याने करोनामुक्त गोवा ही ओळख पुसली गेली आहे. पाच सदस्यांचे एक कुटूंब अलिकडेच मुंबईतून गोव्यात दाखल झाले. ते सर्व जण आणि त्यांच्या वाहनाचा चालक करोनाच्या रॅपिड टेस्टमध्ये पॉझिटिव्ह आढळले.
त्या करोनाबाधितांमध्ये तीन महिलांचा आणि एका बालिकेचा समावेश आहे. त्याशिवाय, गुजरातमधून काही माल घेऊन आलेल्या एका ट्रकचालकाला करोनाचा संसर्ग झाल्याचे आढळले. गोव्यात नव्याने आढळलेल्या सर्व करोनाबाधितांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मागील महिन्यात गोव्यात एकूण सात करोनाबाधित होते.
मात्र, ते सर्व रूग्ण करोनामुक्त झाले. त्यानंतर एकही करोनाबाधित नसल्याने गोव्याला ग्रीन झोनचा दर्जा मिळाला. त्यानंतर गोवा सरकारने बहुतांश आर्थिक व्यवहार सुरू करण्याला परवानगी दिली.