एकीकडे नायक-नायिकांचे मानधनाचे आकडे वाढत चाललेले असताना तंत्रज्ञानाचा वापर करत चित्रपटातील सीन अधिकाधिक बोल्ड, लाईव्हली आणि थरारक वाटावीत यासाठीही प्रचंड पैसा खर्च केला जात आहे. प्रेक्षकांनाही असे सीन आवडत असल्याचे लक्षात येत आहे.
सध्या अशाच एका खर्चाची सिनेसृष्टीत चर्चा आहे. हा खर्च आहे सलमान खानच्या “राधे’ चित्रपटातील एका दृश्यासाठीचा. ईदच्या दिवशी प्रदर्शित होणाऱ्या सलमानच्या या चित्रपटात दिशा पटनी, जॅकी श्रॉफ आणि रणदीप हुडा हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत.
या चित्रपटातील एका 20 मिनिटांच्या दृश्यासाठी तब्बल 7.5 कोटी रुपये खर्च करण्यात आल्याची चर्चा आहे. हा सीन क्रोमाच्या टेक्नॉलॉजीवर शूट झाला आहेआणि तो व्हीएफएक्स हेवी सिक्वेन्सप्रमाणे डिझाईन करण्यात आला आहे.
क्रोमा तंत्रज्ञान हे अत्यंत महागडे आहे. त्यामुळे बडे निर्मातेच याचा वापर करत असतात. “बाहुबली’च्या दोन्हीही चित्रपटांमध्ये या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला होता. निळ्या आणि हिरव्या बॅकग्राउंडवर सीन चित्रीत करण्यासाठी तुलनेने कमी खर्च येतो.
पण क्रोमासाठी आवश्यक असणारे लाईटस् खूप महागडे असतात. त्यानंतर व्हीएफएक्सचा वापर होतो. यामध्ये डिजिटली बॅकग्राऊंड बदलले जाते. अशा या अत्याधुनिक आणि बहुखर्चिक सीनचे दिग्दर्शन प्रभु देवाने केले आहे.