बारामती, इंदापुरात 696 पोलिसांची देखरेख

विधानसभा निवडणूक निर्भयपणे पार पाडण्यासाठी कडक बंदोबस्त

बारामती – विधानसभा निवडणुकीसाठी बारामती व इंदापूर विधानसभा मतदारसंघात 696 पोलीस कर्मचारी निवडणुकीच्या कामावर देखरेख ठेवणार आहेत, अशी माहिती बारामतीचे उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांनी ही माहिती दिली.

बारामतीमध्ये 368 तर इंदापूरमध्ये 332 बूथवर पोलीस कर्मचारी तैनात केले आहेत. बारामती आणि इंदापूरमध्ये प्रत्येकी 24 वाहनांद्वारे पोलीस संपूर्ण मतदारसंघात पेट्रोलिंग करणार आहेत. बारामतीत 45 तर इंदापूरमध्ये 42 मतदान केंद्रांवर 100 मीटरच्या बाहेरदेखील पोलीस कर्मचारी तैनात ठेवण्यात येणार आहेत. अतिरिक्‍त पोलीस अधीक्षक जयंत मीना, उपविभागीय अधिकारी नारायण शिरगावकर यांच्यासह आठ पोलीस निरीक्षक व 24 सहाय्यक पोलीस निरीक्षक व फौजदार दर्जाचे अधिकारी निवडणुकीच्या बंदोबस्तावर तैनात असतील.

मतदानाच्या प्रक्रियेत कोणत्याही प्रकारचा अडथळा येऊ नये व कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ नये यादृष्टीने पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मतदान प्रक्रियेत अडथळा आणण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरुद्ध पोलीस कठोर कायदेशीर कारवाई करतील, असा इशारा त्यांनी दिला आहे.

48 तासांसाठी 399 जण हद्दपार
बारामती व इंदापूर दोन तालुक्‍यात मिळून 399 जणांना मतदानाचा हक्‍क अबाधित ठेवत 48 तासांसाठी हद्दपार करण्यात आल्याची माहिती देखील शिरगावकर यांनी दिली. बारामती मतदारसंघात 10 संवेदनशील मतदान केंद्र असून याठिकाणी निमलष्करी दलाच्या तुकड्यांना पाचारण करण्यात येणार आहे. बारामतीमध्ये 18 तर इंदापूरमध्ये 20 सेक्‍टर करण्यात आले असून बारामतीत 72 व इंदापूरमध्ये 80 पोलीस कर्मचारी सेक्‍टर पेट्रोलिंग करणार आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.