पुणे – पुणे विभागातील अशासकीय अनुदानित महाविद्यालयातील 69 प्राध्यापकांना न्यायालयाच्या आदेशानुसार पीएच.डी. वेतनवाढीच्या फरकाची रक्कम अदा करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यामुळे संबंधित प्राध्यापकांना दिलासा मिळाला आहे.
पुणे, अहमदनगर, नाशिक या जिल्ह्यांतील महाविद्यालयांतील प्राध्यापकांना पीएच.डी.वेतनवाढीचा फरक काही कारणास्तव अदा करण्यात येत नव्हता. याबाबत न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यानुसार न्यायालयाने निर्णय जाहीर केला असून त्याची अंमलबजावणी करण्यासाठी उच्च शिक्षण सहसंचालक कार्यालयाने हालचाली सुरू केल्या आहेत. सहसंचालक डॉ. मोहन खताळ यांनी प्राचार्यांना आदेशही जारी केले आहेत.
पुणे जिल्ह्यातील 15 प्राध्यापकांना 3 लाख 40 हजार 446 रुपये एवढी फरकाची रक्कम मिळणार आहे. अहमदनगर जिल्ह्यातील 14 प्राध्यापकांना 3 लाख 81 हजार 278 रुपये अदा करण्यात येणार आहे. नाशिक जिल्ह्यातील 40 प्राध्यापकांना 10 लाख 27 हजार 632 रुपये देण्यात येणार आहेत. तीन जिल्ह्यांतील प्राध्यापकांसाठी एकूण 17 लाख 49 हजार 356 रुपये खर्च करण्याचे नियोजन आहे. ही रक्कम संबंधित प्राध्यापकांच्या खात्यावर लवकर जमा होणार आहे.